ओळखपत्रासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप, दोषी ठरल्यास चौदा वर्षांचा तुरुंगवास

रशियाव्याप्त अफगाणिस्तानातून निर्वासित झालेल्या नागरिकांच्या वेदनांचा दाहक प्रातिनिधिक चेहरा म्हणून ‘नॅशनल जिऑग्राफिक’ मासिकाच्या मुखपृष्ठावर १९८४ साली झळकलेली शरबत गुला ऊर्फ ‘अफगाण गर्ल’  हिला ओळखपत्रांसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याबद्दल पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शरबत दोषी ठरल्यास तिला १४ वर्षांची शिक्षा तसेच ५ हजार डॉलर दंड आकारण्यात येणार आहे.

खोटय़ा कागदपत्रांद्वारे शरबत पाकिस्तानमध्ये बेकायदा वास्तव्य करीत असल्याचा आरोप तिच्यावर आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या राष्ट्रीय वार्तापत्रांमधून शरबत हिचे संगणकाद्वारे तयार करण्यात आलेले राष्ट्रीय ओळखपत्र जाहीर केले होते. मात्र गेल्या वर्षीपासून अत्यंत सखोल चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी तिला बेकायदा वास्तव्यासाठी अटक केली. तिने आपल्या ओळखपत्रासाठी खोटी कागदपत्रे दिली असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.  एप्रिल २०१४ रोजी शरबत हिला खोटे ओळखपत्र जाहीर करण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा कयास आहे. त्याबाबत तीन अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.  लक्षावधी अफगाणी नागरिक या संघर्षांत पाकिस्तानमध्ये आले. त्यातील अनेकांनी मायदेशी न परतता पाकिस्तानातच खोटी ओळखपत्रे तयार करून राहणे पसंत केले. निर्वासितांना परत पाठविण्यासाठी पाकिस्तानमध्ये २००९ पासून उघडण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत  शरबतला अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत अशा प्रकारे ६० हजार ६७५ खोटी ओळखपत्रे पकडण्यात आली आहेत.

शरबत गुला कोण?

नॅशनल जिऑग्राफीसाठी छायाचित्र-पत्रकार स्टीव्ह मॅक् करी यांनी १९८४ साली पाकिस्तानमध्ये असलेल्या अफगाण निर्वासितांच्या शिबिरातून शरबत गुला हिचे छायाचित्र घेतले होते. मुजाहिदीन बंडखोरांशी रशियन फौजांशी सुरू असलेल्या संघर्षांमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांची वेदना प्रखरपणे मांडणारे छायाचित्र म्हणून ते ओळखले गेले. या छायाचित्राची तुलना ‘लिओनाडरे द व्हिन्ची’ यांच्या ‘मोनालिसा’ या प्रसिद्ध कलाकृतीशी केली गेली. तिसऱ्या जगातील ‘मोनालिसा’, असे तिचे वर्णन केले जात होते.