वनक्षेत्रातील वणवा
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील वनक्षेत्रात पसरलेल्या वणव्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) चिंता व्यक्त केली. या प्रश्नाकडे कोणीही गांभीर्याने पाहात नाही याबद्दल खेद व्यक्त करून लवादाने दोन्ही राज्यांवर कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
सदर वणवा नियंत्रणात आणण्यासाठी काय केले अशी विचारणा एनजीटीचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने पर्यावरण आणि वने मंत्रालयाकडे केली आहे.
सदर वणवा नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काय केले, आमच्यासाठी हा प्रकार धक्कादायक आहे, प्रत्येक जण या प्रश्नाकडे अगदी सहजतेने पाहात आहे, असे पीठाने म्हटले आहे.
याबाबत वने मंत्रालयाच्या वकिलांनी स्पष्ट केले की, वणवा नियंत्रणात आणण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टरही या कामासाठी तैनात करण्यात आली आहेत. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारीचे कोणते उपाय योजण्यात आले आहेत, असा सवाल पीठाने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्य सरकारांना केला. याबाबत राज्यांच्या वकिलांनी सरकारकडून आवश्यक ती माहिती घ्यावी, असेही पीठाने स्पष्ट केले.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील वनांमध्ये वणवा पेटला त्याची कारणे काय आहेत याचे स्पष्टीकरण देण्यासाठी दोन्ही राज्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्याचे आदेश पीठाने दिले. या प्रकरणाची सुनावणी १० मे रोजी होणार असून दोन्ही राज्यांच्या संबंधित सचिवांनी तोपर्यंत स्पष्टीकरण सादर करावे, असा आदेशही देण्यात आला आहे.