नॅशनल हेराल्ड प्रकरणात आपल्याविरुद्ध जारी करण्यात आलेले समन्स रद्द करण्यास नकार देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या दोघांशिवाय या प्रकरणात आरोपी असलेले सुमन दुबे व सॅम पित्रोदा यांनीही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या ७ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या नेत्यांना बजावलेले समन्स रद्दबातल ठरवण्यास नकार दिला होता, इतकेच नव्हे तर त्यांनी हे प्रकाशन ताब्यात कसे घेतले याबद्दल त्यांच्या ‘संशयास्पद वर्तनाबाबत’ कठोर मतप्रदर्शनही केले होते. त्यानुसार हे नेते गेल्यावर्षी १९ डिसेंबरला पतियाळा हाऊस न्यायालयात हजर राहिले होते आणि न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला निश्चित केली असून, सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही अंतरिम दिलासा न दिल्यास त्या दिवशी आरोपींना न्यायालयात हजर राहावे लागेल.
या प्रकरणातील सत्य शोधून काढण्यासाठी, आरोप निश्चित करण्याच्या टप्प्यावर याचिकाकर्त्यांचे संशयास्पद वर्तन योग्यप्रकारे तपासून पाहणे आवश्यक आहे व त्यामुळे या सुरुवातीच्या टप्प्यालाच त्यांच्याविरुद्धची फौजदारी कारवाई रोखली जाऊ शकत नाही, असे त्यांच्याविरुद्धचे समन्स रद्द करण्यास नकार देताना उच्च न्यायालयाने म्हटले होते.