येत्या २३ व २४ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या भारत व पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीचा प्रस्ताव आपल्याला मिळाला असल्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी रविवारी सांगितले.
दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एकमेकांना भेटतील, असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गेल्या महिन्यात रशियातील उफा येथे झालेल्या बैठकीत घेतला होता.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतच्या बैठकीसाठी २३ व २४ जुलैचा प्रस्ताव भारताने दिला असल्याचे अझीझ यांनी सांगितल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे. मात्र, पाकिस्तानने या प्रस्तावित बैठकीला अद्याप मान्यता दिलेली नसून, चर्चेतील बोलण्यांचा अ‍ॅजेंडाही ठरलेला नाही, असे अझीझ म्हणाले.
विविध मुद्दे
प्रस्तावित बैठकीदरम्यान दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सीमेपलीकडील दहशतवाद, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याला मिळालेला जामीन आणि दोन्ही देशांशी संबंधित असलेल्या सुरक्षाविषयक मुद्दय़ांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय मुद्दय़ांवरील बोलणी पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.