राष्ट्रीय नाटय़ अकादमीच्या मुंबई केंद्राला सरकारकडून आठ वर्षांपासून टोलवाटोलवी

संगीत नाटकांपासून ते हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीची ऐतिहासिक समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित राष्ट्रीय नाटय़ अकादमी (एनएसडी) आपले केंद्र सुरू करण्यासाठी उत्सुक असताना, राज्य सरकारकडून मुंबईत जागा देण्याचा प्रस्ताव तब्बल आठ वर्षांहून अधिक काळ धूळ खात पडला आहे. नटश्रेष्ठ अप्पासाहेब बेलवलकरांच्या भाषेत सांगायचे तर, ‘‘कुणी ‘एनएसडी’साठी जागा देता का जागा..?’’ असा प्रश्न नाटय़प्रेमींना पडला आहे.

नाटय़ चळवळीला चालना देण्याबरोबरच उत्तमोत्तम रंगकर्मी तयार व्हावेत, या उद्देशाने मुंबई, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, सिक्कीम व त्रिपुरा या ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय ‘एनएसडी’ने घेतला होता.

अकराव्या व बाराव्या वित्त आयोगाने त्यास मंजुरी देऊन अन्य सोपस्कार पूर्ण केलेले आहेत. एक पैशाची गुंतवणूक महाराष्ट्र सरकारला करावयाची नाही. फक्त जमीन उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र केवळ कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा अपवाद वगळता, केंद्र मंजूर झालेल्या राज्यांनी याउलट औत्सुक्य दाखविलेले नाही. ही माहिती मध्यंतरी राज्यसभेत केंद्रीय सांस्कृतिकमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी दिली होती.

‘एनएसडी’चे संचालक आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. वामन केंद्रे यांनीही त्यास दुजोरा दिला. ‘‘मुंबईत केंद्र सुरू करून मला मराठी रंगभूमीचे ऋण फेडायचे आहे. त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे; पण दुर्दैवाने आठ वर्षांनंतरही मुंबईत जमीन मिळू शकलेली नाही,’’ असे त्यांनी खेदाने सांगितले. अन्य राज्ये असे केंद्र सुरू करण्यासाठी आमच्या पाठीमागे हात धुऊन मागे लागले असल्याचेही ते म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्यापासून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रपटनगरीमधील चार एकर जागा देण्याचे तसेच पु. ल. देशपांडे अकादमीचा चौथा मजला या प्रशिक्षण केंद्रासाठी देण्याचा प्रस्ताव तेव्हापासून आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारबरोबरच भाजप सरकारनेही उदासीनता दाखविली आहे. त्यामुळे एनएसडीचे केंद्र राज्यात कधी सुरू होईल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

‘गोरेगाव चित्रनगरीमध्ये महाराष्ट्र नाटय़ अकादमी’

‘हो, एनएसडी केंद्राच्या जागेचा मुद्दा खूप वर्षे रेंगाळला आहे. आम्ही गोरेगावच्या चित्रनगरीमध्ये एनएसडीच्या सहकार्याने महाराष्ट्र नाटय़ अकादमी (एमएसडी) ही संस्था उभारण्याचे नियोजन केले आहे. सध्या चित्रनगरीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ‘एनएसडी’च्या केंद्रासाठी रवींद्र नाटय़ अकादमीमधील जागा तात्पुरती देऊ,’ असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. प्रदीर्घ विलंबाच्या कारणांबाबत स्पष्ट बोलण्याचे त्यांनी टाळले.

महाराष्ट्राच्या रंगभूमीचा इतिहास व ऐतिहासिक परंपरा लक्षात घेऊन ‘एनएसडी’चे केंद्र महाराष्ट्रात होणे अत्यंत गरजेचे आहे. मी स्वत: नाटय़चळवळीचा उपासक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हे केंद्र सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहे.

-डॉ. वामन केंद्रे, ‘एनएसडी’चे संचालक आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी