राष्ट्रवाद हीच आपल्या पक्षाची ओळख असून नव्या पिढीने हीच ओळख पुढे नेली पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. ते बुधवारी दिल्लीत भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. ११ जणांनी स्थापन केलेला भाजप पक्ष आता ११ कोटी सदस्यांचे कुटुंब बनला आहे. आजवर पक्षासाठी हजारो कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागामुळेच हे साध्य झाले आहे. राष्ट्रवाद हीच आपल्या पक्षाची ओळख असून नव्या पिढीने आपल्या त्यागाने ही ओळख जपली पाहिजे, असे शहा यांनी सांगितले.
देशाला पर्यायी राजकीय विचारसरणी उपलब्ध व्हावी, यासाठी जनसंघाने भाजपची स्थापना केली. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या पश्चिमात्यधर्जिणी धोरणे आणि निर्णय यामुळे राष्ट्रवादी शक्तींना एकत्र येऊन जनसंघाची स्थापना करणे भाग पडले. जर त्याकाळी आपण नेहरूंच्या धोरणांनी चाललो असतो, तर चुकीच्या मार्गाने गेलो असतो, असे शहा यांनी म्हटले.
यावेळी शहांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख जगातील सर्वात लोकप्रिय नेता असा केला. देशात पहिल्यांदाच गरीब आणि तळागाळातील लोकांचा विचार करून धोरणे ठरविणारे सरकार आल्याचे शहा यांनी सांगितले.