२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीचे तख्त राखायचे असेल तर दलित आणि मागास जातीतील लोकांना भाजपकडे आकर्षित केले पाहिजे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील पक्षाच्या ध्येयधोरणांची दिशा स्पष्ट केली. ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलत होते.
राज्या-राज्यातील पक्ष चालविणाऱ्या प्रमुख नेत्यांचा सुकाणू समित्यांची (कोअर टीम) दिवसभराची एक प्रदीर्घ बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी नेत्यांना नवा कानमंत्र दिला. राष्ट्रवादी विचारांच्या लोकांची मते आपल्याबरोबर आहेतच. मात्र, आता दलित आणि मागास जातीतील लोकांना पक्षाकडे आकृष्ट करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी म्हटले. लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना चेतवण्यासाठी देशभरात तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, काही मूठभर लोक सरकारला बदनाम करत असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.
२०१९ साठी २०१७ महत्त्वाचे!.
पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुकाणू समित्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदी-शहा जोडगळीने पक्षनेत्यांना पंधरा वर्षांचे नियोजन करण्याची सूचनाही केली. २०१९ मध्येही दिल्लीचे तख्त राखण्यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातमध्ये भाजपला यश मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पक्षनेत्यांना सांगितले. दरम्यान, भाजपशासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची शहांनी २७ ऑगस्टला स्वतंत्र बैठक बोलाविली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची समन्वय बैठक २९ ऑगस्टला होत आहे. त्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सहभागी होणार असल्याचे समजते.