डोक्लामप्रश्नी भूतान आणि इतर देश हे भारतासोबत आहेत, चीनसोबत नाही अशी भूमिका आज आज केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत मांडली आहे. डोक्लाम प्रश्नी केंद्राची नेमकी काय भूमिका आहे? हा प्रश्न समाजवादीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केला. ज्यानंतर सुषमा स्वराज यांनी आपली नेमकी काय भूमिका आहे ती सांगितली.

डोक्लाममध्ये भारत, भूतान आणि चीन यांच्यादरम्यान एक ट्रायजंक्शन आहे, २०१२ च्या लिखित करारानुसार यामध्ये कोणताही बदल होणार नाही असंही सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं आहे. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या मध्ये जो ट्रायजंक्शन पॉईंट आहे त्याबाबतचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, मात्र त्याआधी चीननं आपलं सैन्य डोक्लाममधून मागे घेतलं पाहिजे असंही स्वराज यांनी स्पष्ट केलं आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोडमध्ये पाकिस्तानकडून आर्थिक मदत घेतली जात असल्याचं भारताला समजताच आम्ही या योजनेला कडाडून विरोध केला आहे, असंही स्वराज यांनी म्हटलं आहे.

सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत मांडलेले मुद्दे

डोक्लाम प्रश्नी ट्रायजंक्शनचा तिढा सोडवण्यासाठी भारत चीन आणि भूतान या तिन्ही देशांची चर्चा सुरू आहे.

भारत आणि चीन यांच्यात जे तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत, याप्रश्नी भूतानसह सगळे देश भारतासोबत आहेत

सैन्य प्रतिबंध कायद्याचा विचार करता भारताची बाजू चीनपेक्षा बळकट आहे

डोक्लाम ट्रायजंक्शनमधून चीननं आधी सैन्य हटवलं पाहिजे मग भारत सैन्य हटवणार

ट्रायजंक्शनप्रकरणी कोणताही देश मनमानी करून त्यामध्ये फेरबदल करू शकणार नाही

भूतान प्रश्नी चीनची भूमिका आक्रमक आहे

डोक्लामप्रश्नी चीननं घेतलेली भूमिका भूतानला पसंत नाही

डोक्लामप्रश्नी राष्ट्रीय सल्लागार समितीनं चीनसोबच भारताचीही बाजू मांडली आहे

डोक्लाममध्ये चीनच्या सैन्यानं घुसखोरी केली आहे. तसंच हा सगळा भाग आमचाच आहे असा दावा चीननं केला आहे, चीनच्या भूमिकेमुळे आणि घुसखोरीमुळे भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. तसंच पाकिस्तानपाठोपाठ चीनही आता भारताच्या कुरापती काढण्यासाठी तत्पर आहे. अशा सगळ्या परिस्थितीत चीनला सडेतोड उत्तर देणं गरजेचं आहे असं देशातल्या प्रत्येकाचं मत आहे. तसंच हा प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विचारला जाणार हे उघड होतं. त्याचमुळे या प्रश्नाला सुषमा स्वराज यांनी सडेतोड उत्तर देत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.