पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपचे माजी खासदार नवज्योतिसिंग सिद्धू यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धू यांनी अजून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही.  याबाबत अधिक माहिती देताना अमरिंदर सिंग म्हणाले, सिद्धू यांचा काँग्रेसशी जुना संबध आहे. त्यांचे वडील पक्षाचे सदस्य होते. त्यांच्यात काँग्रेसचा डीएनए आहे. आम्ही त्यांना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी देऊ शकतो.
सिद्धू आम आदमी पक्षात (आप) प्रवेश करतील अशी चर्चा सर्वत्र होती. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिद्धू हे आपमध्ये सामील झाले नाहीतरी ते आमच्या मनात कायम असतील असे म्हटले होते. पंजाबमध्ये पुढीलवर्षी निवडणुका आहेत. त्यामुळे वक्तृत्वावर पकड असलेल्या सिद्धूला आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे.
पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एका कुटुंबातील एकालाच उमेदवारी देईल असे अमरिंदर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, कोणत्याही व्यक्तीला दोन मतदारसंघातून उमेदवारीची संधी मिळणार नाही. एका कुटुंबातील एकालाच उमेदवारी दिली जाईल.
पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ जागा असून त्यासाठी १६६३ उमेदवारांनी उत्सुकता दाखवली आहे. एकाच कुटुंबातील अनेकांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये ४५ पेक्षा कमी वय असलेल्या ५०० जणांचा समावेश आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी आपला नावावर शिक्कामोर्तब व्हावा या सिद्धू यांच्या मागणीला अरविंद केजरीवाल यांनी नकार दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाराज सिद्धू एका नव्या पक्षाची घोषणा करून त्यामध्ये ते इतर पक्षासह आपमधील असंतुष्ट नेत्यांना सहभागी करून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.