शुक्रवारी रात्री पंजाबमध्ये राजसांसी येथे लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यांच्या मदतीसाठी पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू पुढे सरसावले आहेत. सरकारी तिजोरीतून नव्हे तर स्वतःकडे असलेले पैसे शेतकऱ्यांना देण्याची घोषणा सिद्धू यांनी केली आहे.  एकूण २४ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.  शुक्रवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि बघता बघता उभी पिके जळाली असे शेतकऱ्यांनी म्हटले. त्या शेतकऱ्यांना वीज मंडळाने एकरी ८,००० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण ३०० एकर शेतामधील पिके जळाली आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन सिद्धूंनी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका एकरला ८,००० रुपये ही अतिशय अल्प रक्कम आहे. त्यामुळे मी माझ्यातर्फे शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे असे सिद्धू यांनी म्हटले. मी शेतकऱ्यांच्या वेदना समजू शकतो. वीज मंडळाने जितकी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे तितकीच रक्कम मी माझ्याकडून देईल असे सिद्धू यांनी म्हटले. मी टी. व्ही. शोमध्ये काम करतो. त्यातून मी पैसे कमवतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यात मला कसलिही अडचण नसल्याचे सिद्धूंनी म्हटले. आज सिद्धू यांनी शेतकऱ्यांना भेट दिली. त्यांची विचारपूस केली.

आपण शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे मांडणार आहोत असे सिद्धू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी आपण करणार आहोत असे सिद्धूंनी म्हटले. याच बरोबर अमृतसरचे आयुक्त कमलदीप संघा यांना विजेच्या तारांबाबत काही सूचना सिद्धू यांनी दिल्या आहेत. शेतावरुन जाणाऱ्या तारांची योग्य ती देखभाल करण्याबाबत विज मंडळाशी चर्चा करा असे सिद्धू यांनी म्हटले आहे. याआधी देखील सिद्धू यांनी गो ग्रीन, गो क्लीन या मोहीमेसाठी १ कोटी रुपये दिले होते.