सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोस्तुते
हंसयुक्तविमानस्थे ब्रह्माणीरूपधारिणि
त्रिशूलचन्द्राहिधरे महावृषभवाहिनि
मयूरकुक्कुटवृते महाशक्तिधरे नघे
त्रलोक्यत्राणसहिते नारायणि नमोस्तुते (दुर्गासप्तशती)

सर्व गुणांचा आश्रय असणारी, गुणमयी, आदिशक्ती नारायणी अगणित रूपांमध्ये येऊन त्रलोक्याचे संरक्षण करते. अखिल जगाताच्या सृष्टी-स्थिती-विनाशाला कारणीभूत असणारी ही आदिशक्ती देवी  विविध आयुधे धारण करणारी आणि अनेक वाहनांवर आरूढ झालेली दिसते. ती कधी सिंहवाहिनी तर कधी हंसवाहिनी आहे. कधी मयूरवाहिनी तर कधी वृषभवाहिनी आहे. देवीच्या रूपवैविध्यामध्ये सिंह, व्याघ्र, हंस, महिष, वृषभ, मयूर, गज, उलूक (घुबड), गर्दभ असे अनेक प्राणी आणि पक्षी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात.

देवींची वाहने ही प्रामुख्याने त्यांच्या गुणांची आणि कार्याची निदर्शक आहेत. सिंह हे दुर्गेचे वाहन म्हणून सर्वज्ञात आहे. हे वाहन तिला हिमालयाने दिल्याचा उल्लेख शिवपुराण आणि मरकडेयपुराणात येतो. महिषासुराच्या वधासाठी सर्व देवांनी आपापल्या तेजापासून एक अत्यंत तेजस्वी स्त्री समुत्पन्न केली. शंकराच्या तेजाने तिचे मुख, विष्णूच्या तेजाने भुजा, चंद्राच्या तेजाने स्तन, इंद्रतेजाने कटीभाग असे सर्व अवयव निर्माण झाले. तिच्या या रूपयोजनेनंतर देवांनी तिला शंख, चक्र इत्यादी आयुधे दिली, तर हिमवत् पर्वताने दुग्रेला विविध रत्ने आणि सिंह वाहन दिले. ‘हिमवान् वाहनं सिंहं रत्नानि विविधानि च’ (मार्कण्डेय पुराण)पुढे या वाहनाने असुर युद्धात प्रचंड पराक्रम केला. महिषासुराचा सेनापती महादानव ‘चिक्षुर’ मरण पावल्यावर त्याच्या मरणाचा सूड घेण्यासाठी ‘चामर’ दानव हत्तीवर बसून देवीबरोबर लढायला आला. तेव्हा सिंहाने त्याच्या हत्तीवर झडप घातली आणि चामराशी बाहुयुद्ध करून त्याला यमसदनाला पाठविले.

सिंह: समुपत्य गजकुम्भान्तरे स्थित:

बाहुयुद्धेन युयुधे तेनोच्चस्त्रिदशारिणा   (मार्कण्डेयपुराण)सिंहाने आणखी एका वेळी असाच पराक्रम करून धूम्रालोचन नामक असुराचे हजारो सनिक ठार मारले.

क्षणेन तत् बलं र्सव क्षयं नीतं महात्मना

तेन केसरिणा देव्या वाहनेनातिकोपिना (मार्कण्डेयपुराण)अशा या अतुल पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या सिंहाला धर्मस्वरूप मानले आहे. देवीइतकेच तिचे वाहनही पूजनीय आहे.

दक्षिणे पुरत: सिंहं समग्रं धर्ममीश्वरम्

वाहनं पूजयेद् देव्या धृतं येन चराचरम्  (वैकृतिक रहस्य )अशा प्रकारे सिंह हे वाहन देवीच्या असुरवध कार्याशी आणि शौर्यगुणाशी निगडित आहे. मुळात शक्ती ही तीन गुंणांनी युक्त असून, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही आदिशक्तीपासून समुत्पन्न झालेली रूपे तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुणाची द्योतक आहेत.

चंडी, काली, दुर्गा इत्यादी देवींची उग्ररूपे असुरांचा विनाश करणारी आणि सिंह अथवा व्याघ्र वाहन आहेत. सिंहारूढ देवी ही शक्तीचे तामासीरूप प्रकट करणारी आहेत. खरे तर देवीचा भक्त तिची आराधना ज्या स्वरूपात करतो, त्याच रूपात देवी त्याला दर्शन देते, असे देवीभागवत पुराणात म्हटले आहे. हयग्रीव या दैत्याने अनेक वष्रे तप केल्यानंतर देवी माहेश्वरी तामसस्वरूपात त्याच्यासमोर प्रकट झाली अशी कथा या पुराणात येते. तदाहं तामसं रूपं कृत्वा तत्र समागता  दर्शने पुरतस्तस्य ध्य्तं तत्तेन यादृशम्  सिंहोपरि स्थित्वा तत्र तमवोचं दयान्विता (देवी भागवत)त्याने ज्याप्रमाणे माझे ध्यान केले त्याप्रमाणे तामसरूपात सिंहारूढ होऊन मी त्याला दर्शन दिले असे देवी सांगताना दिसते.

डॉ. सीमा सोनटक्के – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा