पाकिस्तानातील एबोटाबाद येथील एका ठिकाणी लपून बसलेल्या ‘अल काइदा’च्या ओसामा बिन लादेन याला आपल्या गोळीने ठार करणारा अमेरिकन नौदलाचा कमांडो येत्या नोव्हेंबर महिन्यात जगाला माहीत होणार आहे.
अमेरिकेच्या दूरचित्रवाहिनीने तयार केलेल्या माहितीपटात त्याचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीने लादेनला ठार केले त्याच्यावर दोन दिवसांचा माहितीपट (डॉक्युमेंटरी) तयार करण्यात आला आहे. येत्या ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवस हा माहितीपट प्रसारित केला जाणार आहे. २०११ मध्ये एबोटाबादमधील घरात अत्यंत गुप्तरीत्या राहणाऱ्या लादेनला नौदल कमांडोने घराच्या आवारात घुसून मारले होते. त्याविषयीच्या आठवणी कमांडो कथनात स्पष्ट करणार आहे.
लादेनला ठार करण्यासाठी आखलेल्या मोहिमेला ‘नेपच्यून स्पीअर’ असे नाव देण्यात आले होते. या मोहिमेत सहभागी झालेल्या मोजक्या जवानांची आणि तज्ज्ञांची माहिती उघड करण्यात येणार आहे, असे नेटवर्कच्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील कोणतीही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही अथवा त्याचा तपशील कोणालाही देण्यात आलेला नाही; परंतु या वेळी लादेनशी दोन हात करताना त्यांना काय अनुभव आला, याचे कथन ते ‘द शूटर्स’ या कार्यक्रमाच्या दोन भागांत कमांडो करणार आहेत. लादेनला सामोरा जाईपर्यंत ते त्याला गोळी घातल्यानंतर त्याने शेवटचा श्वास घेण्याच्या क्षणांपर्यंत काय घडले, हे या कार्यक्रमात स्पष्ट होणार आहे.