शरीफ यांच्याविरुद्ध द्वेषमूलक वक्तव्य

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात द्वेषमूलक भाषण प्रक्षेपित केल्याबद्दल पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक माध्यम (Pakistan Electronic Media) नियामक प्राधिकरणाने पाकिस्तानातील एका अग्रगण्य दूरचित्रवाणी वाहिनीवर नोटीस बजावली आहे.

सदर नोटिशीबाबत ३१ मार्चपर्यंत म्हणणे मांडण्यास एआरवाय वृत्तवाहिनीला मुदत देण्यात आली आहे. गुरुवारी प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘द रिपोर्टर’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अतिथी वक्त्याने शरीफ यांनी अलीकडेच केलेले वक्तव्य ईश्वरनिंदा करणारे असल्याचे मत व्यक्त केले.

हा अत्यंत धोकादायक कल आहे, कार्यक्रमाच्या आयोजकांनी वक्त्याला वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून रोखले नाही अथवा असे वक्तव्य न करण्याबाबत सूचनाही दिल्या नाहीत. हे प्राधिकरणाच्या नियमांचेही उल्लंघन आहे, असे पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक माध्यम नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.

कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक किंवा निंदाव्यंजक वक्तव्य प्रक्षेपित करणे हा प्राधिकरणाच्या कायद्याचा आणि प्राधिकरणाच्या संहितेतील तरतुदींचा सरळसरळ भंग आहे. द्वेषमूलक भाषण प्रक्षेपित केल्याबद्दल आपल्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस सदर वाहिनीला पाठविण्यात आली आहे.

नियामक प्राधिकरणाला वाहिनीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे आणि त्यांचा परवाना रद्द करण्याचे आणि एक दशलक्ष रुपये दंड ठोठावण्याचे अधिकार आहेत.

दरम्यान, रावळपिंडीजवळ बुधवारी एक विमान कोसळल्याचे बनावट वृत्त दिल्याप्रकरणी प्राधिकारणाने नऊ दूरचित्रवाणी वाहिन्यांवर कारणे-दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

अब्दुल बासित यांची भारतातील राजदूत पदावरून उचलबांगडी?

इस्लामाबाद : पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बासित यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागेवर नव्या राजदूतांची नियुक्ती करण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

पाकिस्तान सरकारने अब्दुल बासित यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी असलेल्या तेहमिना जांजुआ यांना बढती देऊन त्यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केल्याने बासित यांनी सरकारशी संघर्षांची भूमिका घेतली आहे.

अब्दुल बासित यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती होण्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांच्याऐवजी एजाझ अहमद चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे बासित नाराज होते. त्यानंतर बासित यांची मार्च २०१४ मध्ये भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बासित यांना पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा दणका दिला आणि त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या जांजुआ यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती केली. बासित यांनी राजीनामा देण्याचा विचार केला होता, मात्र जांजुआ यांच्या हाताखाली काम करणार नाही, असे स्पष्ट करून बासित यांनी सेवेत राहण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सांगितले.

आता बासित यांच्याजागी ज्येष्ठ मुत्सद्दी सोहेल मेहमूद यांच्या नावाचा भारतातील नवे राजदूत म्हणून विचार केला जात आहे. मेहमूद यांच्यासमवेतच माजी प्रवक्ते तस्नीम अस्लम यांच्या नावाचाही विचार सुरू आहे.