हवाईदलाच्या गुप्त कागदपत्रांतून उघड

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ मारले गेले असते. मात्र ते थोडक्यात बचावले, असे इंडियन एक्स्प्रेसच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.

युद्ध सुरू असताना गुरुवार, २४ जून १९९९ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास भारतीय हवाई दलाची जग्वार लढाऊ विमाने जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या जवळ बॉम्बफेक मोहिमेवर गेली होती. त्यातील एका विमानाने लक्ष्यावर लेसर किरणांनी नेम धरला. दुसरे विमान पहिल्या विमानाने खूण केलेल्या लक्ष्यावर लेसर गायडेड बॉम्ब सोडणार होते. पण ऐन वेळी बॉम्ब सोडण्यात फरक पडला आणि तो मश्कोह खोऱ्यातील अन्य ठिकाणी पडला.

ज्या ठिकाणावर जग्वार विमानाने नेम धरून खूण केली होती ते नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तानी सैन्याचे गुलतेरी नावाचे रसदपुरवठा केंद्र होते आणि नेमक्या त्याच वेळी शरीफ व मुशर्रफ तेथे उपस्थित होते व सैनिकांना संबोधित करत होते. जर विमांनानी तेथे बॉम्ब टाकला असता तर दोघेही मारले गेले असते.

पण त्याने दोन अण्वस्त्रधारी देशांतील युद्धाला कोणते वळण लागले असते त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. गुलतेरी हे ठिकाण पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलिकडे ९ किमी अंतरावर आहे. भारताच्या द्रास खोऱ्यापलिकडे हा भाग येतो. भारतीय सेनेला नियंत्रण रेषेपार हल्ले करण्याची परवानगी नव्हती.