बुरहान वानीला या दशतवाद्याला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये गेल्या महिन्याभरापासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराला पाकिस्तान खतपाणी घालत आहे हे सर्वश्रुत आहे. या आधी बुरहान वानीला ठार केल्यानंतर पाकिस्तानने १९ जुलै हा काळा दिवस म्हणून पाळला होता. यासंबधीची घोषणा खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली होती. आता तर यापेक्षाही वरचढ पाऊल उचलत शरीफ यांनी काश्मिरींना सर्वोतोपरी मदत करण्याची शपथ घेतली आहे.
‘भारताकडे असणा-या काश्मीर खो-यात हजारो निरपराध मारले जात आहेत. स्वातंत्र्य मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून काश्मीरी लोक रस्त्यांवर उतरले आहेत. आपल्या हक्कांसाठी त्यांना जीव गमवावा लागतो आहे. त्यामुळे काश्मीरी जनतेला मदत करण्याची मी शपथ घेतो’ असे ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरचा अध्यक्ष म्हणून मसहूद खान यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी ते बोलत होते. काश्मीरी आंदोलकांना पाकिस्तान नैतिक आणि राजकियदृष्ट्या सर्वप्रकारची मदत करेल असे म्हणत हा मुद्दा आणखी भडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याआधी देखील काश्मीर हिंसाचाराविषयी त्यांनी भाष्य केले होते. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात जो असंतोष खदखदत आहे, त्याला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे आरोप अनेकदा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. पाकिस्तानने काश्मीरमधील हस्तक्षेप थांबवावा असा दमदेखील मोदींनी या आधीच पाकिस्तानला भरला होता. पण, पाकिस्तानच्या कुरापती मात्र थांबल्या नाहीत. या महिन्याच्या सुरूवातील झालेल्या सार्क परिषदेत पाकिस्तनच्या काश्मीर भूमिकेवर गृहमंत्र्यांनी पाकिस्तानाला चांगलेच सुनावले होते. मात्र पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारताचा इशारा ते गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.