पनामा पेपर्स प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचं पंतप्रधानपद जाऊ शकतं अशी शक्यता निर्माण झाली आहे. पनामा पेपर्स प्रकरणी भ्रष्टाचार आणि बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या प्रकरणात जर नवाझ शरीफ दोषी आढळले तर त्यांची खुर्ची जाणार आहे. असं घडल्यास पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शरीफ यांचे बंधू शहबाज शरीफ यांची वर्णी लागू शकते. ‘जियो न्यूज’नं दिलेल्या बातमीनुसार नवाझ शरीफ यांच्या अडचणी वाढू शकतात.

मात्र शहबाज शरीफ हे पाकिस्तानच्या संसदेतल्या दुसऱ्या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळे त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. शरीफ यांचं पद गेल्यास शहबाज यांना पद मिळेपर्यंत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना ४५ दिवसांसाठी प्रभारी पंतप्रधान दिलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला आहे. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात जर नवाझ शरीफ यांच्या विरोधात निर्णय झाला तर सगळे कायदेशीर पर्याय वापरण्यात येतील, त्यातूनही जर शरीफ वाचू शकले नाहीत तर मात्र त्यांना पद सोडावं लागेल. नवाझ शरीफ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते आणि काही कायदेतज्ज्ञांनीही भाग घेतला होता.

नवाझ शरीफ यांचं पंतप्रधानपद धोक्यात नाही संपूर्ण पक्ष शरीफ यांना पाठिंबा देणार आहे अशीही एक बातमी पाकिस्तानमधल्या काही सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल यावर बैठकीत चर्चा झालीच नाही असंही याच सूत्रांनी म्हटलं आहे.

दरम्यान पाकिस्तानातल्या सुप्रीम कोर्टानं पनामा पेपर्स प्रकरणात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे पण कोर्टानं निकाल राखून ठेवला आहे. १९९० मध्ये लंडनमध्ये शरीफ यांनी जी मालमत्ता खरेदी केली त्याच्यासाठी पैसा कुठून आणला याची चौकशी करण्याचं काम एका सहा सदस्यीय समितीकडे सोपवण्यात आलं होतं. आता एक बातमी शरीफ यांचं पद जाणार अशी येते आहे त्यांच्या जागी पदभार शहबाज शरीफ सांभाळू शकतात असंही सांगण्यात येतंय. तर दुसरी चर्चा शरीफ यांना धोका नसल्याचीही होते आहे. आता काय होणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.