छत्तीसगडमध्ये एका माओवादी डेप्यूटी कमांडरला स्फोटकांसह अटक करण्यात आली. त्याच्यावर ३ लाख रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्याला विजापूर जिल्ह्यातून जाताना पकडले.

राकेश सोढी (वय २०) असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात येते. त्याला आवापल्ली पोलीस ठाण्यातील परिसरातून अटक करण्यात आल्याचे विजापूरचे पोलीस अधिक्षक के.एल. ध्रूव यांनी सांगितले. सुरक्षा दलांच्या संयुक्त टीमने ही कारवाई केली. यामध्ये सीआरपीएफची २२९ वी बटालियन आणि जिल्हा बल सहभागी झाले होते. ही टीम कंवरगुडा आणि कोट्टागुडा गावात दबा धरून बसले होते.

सुरक्षा दलाला पाहून राकेश पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, लगेचच त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून एक टिफिन बॉम्ब, २ डिटोनेटर आणि इलेक्ट्रिक वायर जप्त करण्यात आल्याचे ध्रुव यांनी सांगितले.