हल्ल्यातून बचावलेल्या जवानाची माहिती

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी हल्ला करून २५ जवानांना ठार केले त्या नक्षलवाद्यांकडे रॉकेट लॉन्चर आणि एके-४७ रायफली होत्या, अशी माहिती या हल्ल्यातून बचावलेल्या एका जवानाने दिली आहे.

प्रथम गावकरी आले आणि त्यांच्यापाठोपाठ काळ्या वेशातील नक्षलवादी आले, जवळपास ३०० नक्षलवादी होते, असेही या जवानाने सांगितले. इतकेच नव्हे तर काही नक्षलवाद्यांकडे एके-४७ रायफली, एसएलआर आणि अन्य स्वयंचलित शस्त्रे होती असे अन्य एका जवानाने सांगितले. या दोन जवानांवर रायपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना प्रथम ठिकाणाची पाहणी करण्यासाठी पाठविले, गावकऱ्यांकडे शस्त्रे नव्हती, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गोळीबार कसा करणार. मात्र आम्हीही प्रत्युत्तर दिले आणि अनेक नक्षलवाद्यांना ठार केले, त्यामध्ये काही महिलाही होत्या, असे एक जवान म्हणाला. नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी आम्हाला या परिसरात ‘अफस्पा’ कायद्याचे अधिकार द्यावेत, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना करीत असल्याचे शेर मोहम्मद खान या जवानाने सांगितले.