विशाखापट्टणम जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी तेलुगु देशम पक्षाच्या (टीडीपी) तीन स्थानिक नेत्यांना ओलीस ठेवले आहे.
सदर नक्षलवाद्यांनी या तीन नेत्यांना धारकोंडा येथे भेटण्यास सांगितले. त्यानुसार सदर तीन नेते त्यांना भेटण्यासाठी तेथे गेले. मात्र आपल्याला कोणतीही इजा करण्यात येणार नाही, असे आश्वासन या नेत्यांना देण्यात आले.
त्यानंतर एम. बालय्या, एम. महेश आणि व्ही. बालय्या हे तीन नेते धारकोंडा येथे गेले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या बाबत पोलिसांना सोमवारी रात्री माहिती मिळाली आहे. या माहितीची आम्ही खातरजमा करून घेतली आहे. नक्षलवाद्यांनी या तीन नेत्यांना पूर्व गोदावरी जिल्ह्य़ातील घनदाट जंगलात नेले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या नेत्यांच्या सुटकेसाठी नक्षलवादी कोणत्या मागण्या करतात त्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.