काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली १६ विरोधी पक्षांची बैठक संसद भवनात पार पडली. या बैठकीवर राष्ट्रवादीनं बहिष्कार घातल्याचं दिसून आलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ममता बॅनर्जी, ओमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासह १६ विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला हजर होते. जदयू खासदार अन्वर अली यांचाही या बैठकीत सहभाग होता.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या बैठकीत कोणीही सहभागी झालं नाही. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते या बैठकीत हजर झाले नाहीत अशी माहिती गुलाम नबी आझाद यांनी दिली. मात्र राष्ट्रवादीचा कोणी प्रतिनिधीही या बैठकीला हजर नव्हता. सोनिया गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्यांची एक छोटी समन्वय समिती तयार करावी अशी विनंती आज बैठकीत करण्यात आल्याचं गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना सांगितलं. ही समिती विरोधी पक्षांशी चर्चा करेल आणि जनतेचे कोणते प्रश्न उचलून धरायचे त्याची रणनीती तयार करेल असंही आझाद यांनी स्पष्ट केलं आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं मात्र हिवाळी अधिवेशनासाठी आणखी साडेतीन महिन्यांचा कालावधी आमच्याकडे आहे. या कालावधीत सगळ्याच विरोधी पक्षांनी जनतेशी निगडीत आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न उचलून धरण्यासाठी तयारी केली पाहिजे असंही आझाद यांनी स्पष्ट केलं. तसंच विरोधी पक्षांमध्ये एकजूट कशी राहिल यावरही या बैठकीत चर्चा झाली. सरकारविरोधात अजेंडा तयार करणं आणि सगळ्या विरोधकांची एकजूट या दोन महत्त्वाच्या विषयांवर झालेल्या या बैठकीला शरद पवार किंवा राष्ट्रवादीचे कोणीही नेते हजर नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच शरद यादव यांचे निकटवर्तीय असलेले अन्वर अली हे बैठकीला आल्यानं त्यांच्या उपस्थितीचीही चर्चा होती.

गुजरात राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यावेळी आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही. तरीही काँग्रेस प्रवक्त्यांनी राष्ट्रवादीवर टीका सुरू ठेवली. अशात आम्ही बैठकीला आम्ही कसे जाणार? आमच्या बैठकीला जाण्याला अर्थच उरत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. आमचा पक्ष स्वतंत्र आहे, काँग्रेसची बी टीम नाही, तसंच आम्ही काँग्रेससोबत युतीही केलेली नाही अशात गुजरात राज्यसभेवरून आमच्यावर काँग्रेसनं टीका केली त्याचमुळे आम्ही बैठकीवर बहिष्कार घातला असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.