निवडणूक आयोगाच्या सुधारणेने नामुष्की टळणार

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमाविण्याची टांगती तलवार राष्ट्रवादी काँग्रेसवरून दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच निवडणुकीतील यशापयशाऐवजी सलग दोन निवडणुकांमधील कामगिरीवर आधारित दर्जा ठरविण्याचा निर्णय सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. त्याचा फायदा राष्ट्रवादीबरोबरच लोकसभेत सुमार कामगिरी करणाऱ्या बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही मिळणार आहे. राज्य पक्ष म्हणून असाच फायदा कदाचित मनसेलाही होऊ  शकतो.

निवडणूक चिन्ह (आरक्षित आणि वाटप) आदेशातील कलम ६ (क) मध्ये बदल करणारी अधिसूचना आयोगाने सोमवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार, निवडणूक संपल्यानंतर लगेचच राष्ट्रीय किंवा राज्य पक्षांच्या दर्जाचा फेरविचार करण्याऐवजी त्यापुढील सार्वत्रिक निवडणुकांनंतरच फेरविचार करण्याची दुरुस्ती केली आहे. म्हणजे पाच वर्षांनंतर होणारा फेरआढावा आता थेट दहा वर्षांनी होईल. म्हणजे जर राष्ट्रवादीची २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही सुमार कामगिरी झाली तरच तिचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला जाऊ  शकतो. सध्या त्यांना निवडणूक आयोगाने दर्जा काढून घेण्याबाबत नोटीस बजावलेली होती.

देशात सहाच राष्ट्रीय पक्ष

सध्या देशात भाजप, काँग्रेस, मार्क्‍सवादी, भारतीय कम्युनिस्ट (सीपीआय), राष्ट्रवादी आणि बसपा असे सहाच पक्ष राष्ट्रीय आहेत आणि ६४ पक्षांना राज्य पक्षाचा दर्जा आहे. किमान २ टक्के जागा म्हणजे ११ खासदार हवेत किंवा चार राज्यांतून सहा टक्के मते व किमान चार खासदार निवडून आले पाहिजेत, अशी राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी पात्रता लागते. २०१४मध्ये राष्ट्रवादीला फक्त १.६ टक्के मते आणि सहा जागा मिळाल्या होत्या. बसपाला ४.१ टक्के मते मिळाली, पण एकही जागा मिळाली नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ०.८ टक्के मते आणि फक्त एक जागा मिळाली होती. त्याचबरोबर लोकसभेपाठोपाठ पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये सुमार कामगिरी केलेल्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षालाही असाच धोका निर्माण झालेला आहे. पण आयोगाच्या नव्या सुधारणेने तो दूर झाला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यास चिन्ह देशपातळीवर राखून ठेवले जाते. याशिवाय मुख्य प्रचारकांची (स्टार कॅम्पेनर) संख्या चाळीसवर नेता येते. त्यांच्यावर झालेला खर्च निवडणूक खर्चात धरला जात नाही. तसेच सरकारी माध्यमांमध्ये हुकमी संधी मिळते. एकूण निवडणूक प्रक्रियेतही राष्ट्रीय पक्षांना उजवे स्थान मिळत असते.