केंद्रातील एनडीएचे सरकार तेलंगणाला सहकार्य करीत नाही त्यामुळे नव्या राज्याला हक्कांसाठी संघर्ष करणे भाग पडत आहे, असे तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) नेत्या के. कविता यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून एकदाही तेलंगणाचा दौरा केलेला नाही, अशी खंतही कविता यांनी व्यक्त केली आहे.
नव्या राज्याला केंद्राचा पाठिंबा नाही, मोदींनी एकदाही तेलंगणाला भेट दिली नाही, असे कविता म्हणाल्या. कविता या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या असून निझामाबाद लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.
मोदी यांनी आतापर्यंत अनेक परदेशवाऱ्या केल्या. अन्य देशांसमवेत सौहार्दपूर्ण संबंध विकसित करणे महत्त्वाचे आहे, मात्र त्याचबरोबर आपल्या देशातील एक राज्यही तितकेच महत्त्वाचे आहे, विशेषत: आंध्र प्रदेश आणि तेलंगणही तितकीच महत्त्वाची राज्ये आहेत त्यामुळे केंद्राने त्यांच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे, असे कविता म्हणाल्या.