शेतजमिनीच्या किंमती वाढताहेत आणि कॉर्पोरेट व्यक्तींना जमिनी हव्या आहेत. त्यामुळेच मोदी सरकार शेतकऱयांना कमजोर करीत असल्याचा हल्ला कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरातील शेतकऱयांचे झालेले नुकसान यावर लोकसभेमध्ये नियम १९३ अंतर्गत चर्चा झाली. या चर्चेमध्ये राहुल गांधी यांनीसुद्धा भाग घेतला.
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सुटीवर असलेले राहुल गांधी यांनी दुसऱया सत्राच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, देशातील ६७ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारण एवढे चांगले कळते, तर ते शेतकऱयांकडे दुर्लक्ष का करताहेत? कॉर्पोरेट मित्रांसाठी सरकार शेतकऱयाकडे दुर्लक्ष करते आहे. पण आत्ता शेतकऱयांकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात ते तुम्हाला नुकसान पोहोचवतील, असा सूचक इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.
मोदी सरकार अच्छे दिन सरकार नसून, सूट-बुटाचे सरकार आहे, असे सांगून ते म्हणाले, हे केवळ उद्योगपतींचे सरकार आहे. शेतकऱयांचे, मजुरांचे ऐकण्यास सरकारला वेळ नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे किती नुकसान झाले, याचे वेगवेगळे आकडे सरकारकडून सांगण्यात येत आहेत. असे वेगवेगळे आकडे सांगण्यापेक्षा किती नुकसान झाले, याची पाहणी मोदी स्वतः का करीत नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.