राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ) सोमवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली. व्यंकय्या नायडू यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यामुळे एनडीएतील सर्व घटकपक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे शहा यांनी सांगितले. यावेळी शहा यांनी नायडू यांच्या राजकीय कारकीर्दीचा नव्याने परिचयही करून दिला.

‘लोकसत्ता ऑनलाईन’कडून आज सकाळीच भाजप उपराष्ट्रपतीपदासाठी व्यंकय्या नायडू यांची निवड करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अखेर ही अटकळ खरी ठरली आणि एनडीएतील सर्व घटकपक्षांच्या सहमतीने व्यंकय्या नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार आता व्यंकय्या नायडू उद्या आपला उमेदवारी अर्ज भरतील. या शर्यतीत व्यंकय्या नायडू यांच्यासोबत द्रौपदी मुरमू आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांची नावेही आघाडीवर होती. राजकारणाचा तब्बल २५ वर्षांचा दांडगा अनुभव असलेले व्यंकय्या नायडू सध्या मोदी सरकारमध्ये शहर विकास मंत्री आहेत. वाजपेयींच्या काळात त्यांनी ग्रामविकास खात्याची धुरा सांभाळली होती. ‘यूपीए’कडून यापूर्वीच गोपाळकृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. याकूब मेमनच्या फाशीला गांधी यांनी विरोध केला होता. त्यांना काँग्रेससह १८ इतर पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्टला होणार आहे. त्याच दिवशी मतदान होईल आणि त्याचदिवशी मतमोजणीही केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै आहे.