परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा दडवून ठेवलेल्या खातेधारकांची नावे जाहीर करण्याच्या प्रश्नावरून एनडीएने घूमजाव केले असल्याच्या आरोपाचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी जोरदार खंडन केले. सरकारला या निर्णयामुळे साहसशून्य ठरवता येणार नाही आणि भविष्यात अन्य देशांकडून मिळणारे सहकार्य धोक्यात घालता येणार नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले आहे. काळ्या पैशांबाबत एनडीए सरकारची भूमिका निग्रहपूर्वक सातत्याची आहे, दुस्साहसाची नाही. परदेशातील खातेदारांची नावे शोधून दोषींवर कारवाई करण्यास आणि ती जाहीर करण्यास सरकार बांधील आहे. कराराचा भंग होईल अशा दुस्साहसी कृत्य आम्हाला करावयाचे नाही, असे जेटली यांनी फेसबुकवर म्हटले आहे. अशा प्रकारच्या भूमिकेचा खातेधारकांनाच लाभ होईल, दुस्साहस अल्पजीवी असते, परिपक्व भूमिका घेतल्यास आपल्याला या प्रश्नाच्या मुळाशी जाता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. सर्व माहिती जाहीर करता येणे शक्य नाही कारण भारताचा ज्या देशांशी दुहेरी कराबाबत करार आहे त्यांनी नावे जाहीर करण्यास हरकत घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.