क्लोनिग तंत्राने सजीवांचे प्रतिरूप तयार करता येते त्याचा उपयोग नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या पशुपक्ष्यांच्या प्रजाती तयार करण्यासाठी होतो. त्याचबरोबर जास्त दूध देणाऱ्या गायीम्हशी तयार करण्यासाठीही होतो. असाच प्रयोग कर्नाल येथील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे करण्यात आला असून जास्त दूध देणाऱ्या म्हशीच्या पिलाचे क्लोनिंग केले आहे. म्हशीच्या पेशी घेऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे. म्हशीच्या पिलाचे (रेडकू) नामकरण ‘स्वरूपा’ असे करण्यात आले आहे.
प्रौढ म्हशीच्या कानाची पेशी घेऊन त्यापासून ‘स्वरूपा’ची निर्मिती केली असून म्हशीचे नाव करणकीर्ती असे आहे, असे एनडीआरआयचे संचालक ए.के.श्रीवास्तव यांनी सांगितले. क्लोनिंग तंत्राने जन्मलेल्या ‘स्वरूपा’चे वजन ३२ किलो असून यापूर्वी याच म्हशीच्या पूर्णिमा या क्लोन म्हशीचा जन्म ६ सप्टेंबर २०१३ रोजी झाला होता पण ती १९ दिवस जगली होती. स्वरूपासह एनडीआरआयने आतापर्यंत म्हशींचे अकरा क्लोन तयार केले त्यातील तीन मरण पावले आहेत. स्वरूपा या क्लोनिंगने निर्माण केलेल्या म्हशीच्या प्रयोगात एस.के.सिंगला, एम.एस चौहान, आर.एस माणिक, पी.पाल्टा, एस.एस. लाथवाल व अनुज के. राजा यांचा सहभाग होता. त्यांनी सांगितले, की त्वचापेशींचा वापर करून क्लोनिंग करण्याच्या तंत्राने जनुकशास्त्रात क्रांती घडून आली आहे.
करणकीर्ती या म्हशीने पहिल्या ४२७ दिवसांच्या दुग्धचक्रात ४४२५ किलो दूध दिले नंतर ३०५ दिवसांच्या अवधीत ३८१२ किलो दूध दिले. या म्हशीने दिवसाला जास्तीत जास्त २५.१ किलो दूध दिले आहे. संस्थेच्या इतिहासातील हा एक विक्रम आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. जास्त दूध देणाऱ्या म्हशींची पैदास करण्यासाठी क्लोनिंगचे तंत्र उपयोगी असून जगात म्हशींची सर्वाधिक संख्या भारतात आहे. देशातील एकूण दुग्धोत्पादनाच्या ५५ टक्के उत्पादन म्हशीच्या दुधाचे असते. उच्च प्रजातीच्या म्हशींची संख्या मात्र वाढवण्याची गरज आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे महासंचालक एस.अय्यपन यांनी सांगितले, की आपण संशोधकांचे अभिनंदन करतो, नवीन क्लोनिंग तंत्राचे नाव ‘हँड गायडेड क्लोनिंग’ असे असून त्यामुळे गर्भपेशी पटकन वाढतात. या तंत्राने देशात दुग्धोत्पादन वाढवता येईल.

म्हशीचे क्लोनिंग
* कानाच्या पेशीपासून क्लोनिंग
* नवीन म्हशीचे नाव स्वरूपा
* वजन ३२ किलो
* दुग्धोत्पादन वाढवण्यात मदत
*म्हशींच्या संख्येत भारत दुसरा
* चांगल्या प्रजातीच्या म्हशींची संख्या वाढवण्याचा हेतू