विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नवी दिल्लीमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी कसोशीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत मांडले. अयोध्येत राम मंदिर उभारून सर्वांनी अशोक सिंघल यांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केली.
मोहन भागवत म्हणाले, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच माझी अशोक सिंघलाशी भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी दोन गोष्टी प्रत्यक्षात आल्या पाहिजेत, अशी भावना व्यक्त केली होती. एक म्हणजे अयोध्येत राम मंदिराची उभारणी आणि दुसरे म्हणजे जगामध्ये वेदांचा प्रसार. या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले गेले पाहिजेत. अशोक सिंघल यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर ते आपलेच स्वप्न आहे, असे मानून आपण सर्वांनी काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अशोक सिंघल यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून आपण पुढे प्रवास करीत राहिलो पाहिजे. त्यांनी मांडलेल्या विचारांतून आपल्याला मार्गदर्शन होत राहिल, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.
अशोक सिंघल हे कायमच सगळ्यांसाठी मार्गदर्शक राहतील. ते चांगले वक्ते आणि हिंदूत्त्ववादी चळवळीचे उर्ध्वयू होते, असेही त्यांनी सांगितले.