अमेरिकेतील गायक नील यंग हे नावाने ‘तरुण’ असले तरी वयाच्या ६८व्या वर्षी ते पत्नी पेगी हिच्याशी असलेले ३६ वर्षांचे वैवाहिक संबंध संपुष्टात आणणार आहेत. गेल्या जुलैमध्ये त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या वर्षीच्या अखेरीस त्यांच्या याचिकेवर सुनावणी होईल.
पेगी ६१ वर्षांच्या आहेत आणि गायिका आहेत. खरे तर नील यंग यांच्या ‘सच अ वुमन’,  ‘अननोन लीजन्ड’ आणि ‘वन्स अ‍ॅन अँजेल’ या गीतांपासून पेगी या प्रेरित झाल्या होत्या. त्यांच्या कॅलिफोर्नियातील भेटीचे स्मरण म्हणून यंग यांच्या ओठातून उमटलेले ‘अननोन लीजन्ड’ हे गीत अजरामर झाले.
९०च्या दशकात पेगी यांनीही यंग यांना गायिका म्हणून अनेक गाण्यांत साथसंगत केली आहे. या दोघांना दोन मुले आहेत. मुलगा बेन हा ‘सेरेब्रल पाल्सी’ या असाध्य व्याधीने ग्रस्त आहे, तर मुलगी अम्बेर जेन हिलासुद्धा आजार जडला आहे.
यंग आणि पेगी यांनी मिळून असाध्य व्याधिग्रस्त मुलांसाठी ‘द ब्रिज स्कूल’ ही धर्मादाय संस्था स्थापन केली आहे. दोघांनीही या संस्थेसाठी निधी जमविण्यासाठी गेल्या ऑक्टोबर महिन्यात खास कार्यक्रम केला होता. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात यंग आणि पेगी एकत्र येण्याच्या वदंता आहे, पण कार्यक्रम पत्रिकेतून पेगी यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे.