हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमधील मोठय़ा भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या सात हजार झाली आहे, या भूकंपाला आज एक आठवडा पूर्ण झाला, सरकार या मोठय़ा दुर्घटनेशी झुंजत असून जखमींची संख्या १४०२५ असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शनिवारी सकाळी नेपाळमध्ये भूकंपाचा ४.५ रिश्टर तीव्रतेचा धक्का बसला असून लोकांमध्ये त्यामुळे घबराट पसरली मदत वेळेत पोहोचत नसल्याने अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर गोरखा जिल्ह्य़ात ५.१ रिश्टरचा धक्का बसला असून त्यात एक महिला जखमी झाली आहे.
नेपाळच्या दूरस्थ पर्वतराजीतील भागात भूकंपाने अनर्थ घडवला. नेपाळमध्ये दूरस्थ भागात मदत उशिरा पोहोचली. त्यानंतरही भूकंपाचे लहान मोठे धक्के बसतच आहे.
आयएफआरसीचे आशिया पॅसिफिक संचालक जगन चॅपगेन यांनी सांगितले की, आमचे एक पथक सिंधुपालचौक येथून परत आले. तेथे ९० टक्के घरे कोसळली आहेत, रुग्णालयही कोसळले आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये अजूनही युरोपीय समुदायाच्या एक हजार नागरिकांचा ठावठिकाणा लागलेला नाही.