नेपाळसह उत्तर भारताला मंगळवारी बसलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधानांनी उत्तर भारत आणि नेपाळमधील भूकंपाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून मदत आणि बचावकार्यासाठी दक्ष राहण्याचे आदेश दिले असल्याचे ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारी १२.३५ मि. नेपाळमधील कोडारी येथे ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यानंतर तासाभरात तब्बल ६ वेळा नेपाळ भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. तसेच उत्तर भारतात देखील भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारतातील बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम, झारखंड, सिक्कम, हिमाचल प्रदेश या राज्यांना भूकंपाचा धक्का बसला. नेपाळमधील या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३६ वर गेली असून एक हजार हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर, बिहारमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.