उत्तर भारताला बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांच्याशी संपर्क साधून दोन्ही राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. याशिवाय, दुपारी तीन वाजता नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आपातकालीन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी भारताच्या विविध भागांतील परिस्थितीचा आढावा घेतील. भारत आणि नेपाळमध्ये भूकंपानंतर असलेल्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती मोदी यांनी ट्विटरवरून दिली. नेपाळचे राष्ट्रपती राम बरान यादव यांच्याबरोबरही नरेंद्र मोदींनी बातचीत केली असून, भारतातून नेपाळला मदत पाठवता येईल का, याबद्दल विचारणा केली. काठमांडू भागात केंद्र असलेल्या या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठ्याप्रमाणावर जिवीतहानी आणि वित्तहानी झाली आहे. तसेच काठमांडू शहरात भूकंपामुळे संपूर्ण संपर्क व्यवस्था उद्धस्त झाली आहे. काठमांडू शहरात असणाऱ्या दरारा टॉवरच्या परिसरातील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. हा टॉवर कोसळून त्याच्याखाली अनेक पर्यटक गाडले गेल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.