हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळवर शनिवारच्या भीषण भूकंपाने आपत्तीचा हिमालयच कोसळला. या भूकंपात १५०० नागरिक मृत्युमुखी पडले असून हजारो जखमी झाले आहेत. तब्बल ७.९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी झाला आणि दोन मिनिटांत त्याच्या तांडवात अनेक इमारती कोसळल्या तर रस्ते उखडले गेले. १६ भूकंपोत्तर धक्क्य़ांनीही नेपाळवर भीतीची छाया अधिकच गडद केली. भारतातही या भूकंपाने ५१ जण मृत्युमुखी पडले असून २३७ जखमी झाले आहेत. dv04काठमांडूच्या वायव्येला ८० किलोमीटरवर असलेल्या लामजंग येथे भूूकंपाचा केंद्रबिंदू आहे. भूकंपोत्तर धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदली गेली. काठमांडूची ओळख असलेला ‘धरहरा’ मनोराही भूकंपात भुईसपाट झाला असून त्याच्या ढिगाऱ्याखालून २०० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
पाचव्या शतकातील पशुपतीनाथाच्या मंदिराला कोणतीही हानी झाली नसल्याचे वृत्त असले तरी काठमांडूतील असंख्य वास्तू व इमारतींची मोठी हानी ओढवली आहे. रस्तेही उखडले गेले आहेत.

उत्तर, पूर्व व ईशान्य भारताला धक्का

नेपाळमधील भूकंपाने उत्तर, पूर्व तसेच ईशान्य भारतही हादरला असून तेथे ५१ जण ठार झाले आहेत. नेपाळला लागून असलेल्या बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजे ३८ जण मृत्युमुखी पडले असून ४८ जखमी आहेत. उत्तर प्रदेशात ११ जण ठार झाले आहेत.  पश्चिम बंगालमध्ये पालिका निवडणुका सुरू असतानाच झालेल्या या भूकंपाने प्रशासकीय यंत्रणेलाही जोरदार धक्का दिला असून दोनजण मृत्युमुखी पडले आहेत. पश्चिम बंगालच्या माल्डा जिल्ह्य़ात दोन शाळांत छत कोसळून ४० विद्यार्थी जखमी झाले.

भारताकडून मदतपथक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भूकंपबाधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून केंद्रीय मदत पथके पाठविली आहेत. नेपाळमध्येही मदत पथके रवाना झाली असून तेथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेची मोहीमही सुरू झाली आहे. भारताने नेपाळला तातडीने वैद्यकीय मदत तसेच डॉक्टर व मदतकार्यातील तज्ज्ञ कर्मचारी पाठविले आहेत.

१० गिर्यारोहक ठार

भूकंपाने माऊंट एव्हरेस्टवरही हिमकडे कोसळले. यात एव्हरेस्टचा गिर्यारोहकांसाठीचा तळछावणीचा भागही नष्ट झाला असून दहा पर्यटक ठार झाले आहेत. त्यांची ओळख मात्र पटलेली नाही.
नेपाळमध्ये शनिवारच्या भूकंपात ढासळलेल्या इमारती आणि खचलेल्या रस्त्यांपेक्षा ढासळलेल्या आयुष्यांची आणि खचलेल्या मनांची तीव्रता अधिकच भयकंपित करणारी आहे. होत्याचे नव्हते झालेल्या काठमांडूत मदतकार्यासाठी धाव घेणाऱ्यांच्या हाती कलेवराचाच नि:शब्द हात येत आहे..
dv05*बिहार ३८ ठार, १३३ जखमी.
*उत्तर प्रदेश ११ ठार.
*पश्चिम बंगाल २ ठार आणि ४० शाळकरी मुलांसह ६९ जखमी.
*दिल्लीत ६ इमारतींना तडे.
*सिक्कीममध्ये विविध भागांत भूस्खलन, पण जीवितहानी नाही.
*मणिपूर, मिझोरम, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरातही धक्के.

महाराष्ट्रातले ८०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले
नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपात महाराष्ट्रातील सुमारे ८००च्या आसपास पर्यटक अडकले असून हे पर्यटक सुखरूप आहेत. काही पर्यटक परतीच्या मार्गावर असून काहींची व्यवस्था नेपाळमधील सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारचा १८७ पर्यटकांशी संपर्क झाला असून त्यातील ७० जण वीणा वर्ल्ड या पर्यटक कंपनीबरोबर गेले आहेत. उरलेल्या पर्यटकांमध्ये ७४ नाशिकचे, १४ पिंपरी-चिंचवडचे, पाचजण दौंडचे, पाचजण हडपसरचे, चारजण साताऱ्याचे आहेत. महाराष्ट्रातील विक्रीकर खात्यातील १५ अधिकाऱ्यांचा गटही नेपाळात असून त्यांच्याशीही संपर्क झाला आहे.

स्थानिक दरांत दूरध्वनी
नेपाळमधील अनेक नागरिक भारतातही असल्याने बीएसएनएल आणि महानगर टेलिफोन निगम सोमवापर्यंत नेपाळला केल्या जाणाऱ्या दूरध्वनींना स्थानिक दरच आकारणार आहे. एअरटेल ४८ तासांसाठी मोफत सेवा देणार आहे.

महाराष्ट्राचे मदतक्रमांक
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या आप्तांसाठी दूरध्वनी क्रमांक :
महाराष्ट्र सदन, दिल्ली येथील विशेष कक्ष ०११- २३३८ ०३ २५.
मंत्रालय – ०२२ – २२०२ ७९ ९०.

चंद्रपुरात इमारत कलली
भूकंपाचे सौम्य धक्केनागपूर आणि चंद्रपूरला जाणवले. यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. चंद्रपुरात कमला नेहरू कॉम्प्लेक्स व इंदिरा गांधी काँग्रेस भवन या दोन इमारतींचा मागील भाग भूकंपाच्या धक्क्याने थोडासा कलला.

बाबा रामदेव बचावले
काठमांडूतील योगशिबीर संपवून बाबा रामदेव व्यासपीठावरून उतरताच भूकंपाने व्यासपीठ कोसळले. त्यामुळे  बाबा रामदेव सुखरूप बचावले.