ज्येष्ठ राजकारणी के.पी. शर्मा ओली यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. चांगले काम करण्याची मला शिक्षा मिळाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी राजीनामा दिल्यानंतर दिली. अविश्वास ठरावामध्ये आपल्याला बहुमत मिळवता येणार नसल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा सीपीएन-माओवादीने काढून घेतल्याने सरकार अडचणीत सापडले होते. यापूर्वी करण्यात आलेल्या करारांची अंमलबजावणी करण्यास सरकार असमर्थ ठरल्याचा आरोप सीपीएन-माओवादीने केला होता. नेपाळमध्ये थेट लढतीत त्यांनी विद्यमान पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव करुन नेपाळची सुत्रे हाती घेतली होती.  देशाच्या नव्या घटनेवरून हिंसक निदर्शने सुरू असतानाच पंतप्रधानपदाबाबत सहमती घडवून आणण्यात राजकीय पक्ष अयशस्वी ठरल्यामुळे या पदासाठी निवडणूक आवश्यक ठरली होती. यावेळी संसदेत झालेल्या मतदानामध्ये सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष असलेले ओली यांनी जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या २९९ मतांपेक्षा ३९ अधिक, म्हणजे ३३८ मते मिळवली होती. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला यांना फक्त २४९ मते मिळवता आली होती. सध्या नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीमध्ये राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे संविधानाती कलम ३०५ मधील तरतुदीमधील अडचणी दुर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.