नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसला पंतप्रधानपदावर संधी मिळावी यासाठी दहल यांनी राजीनामा दिला.

नऊ महिन्यांपूर्वीच माओवादी नेते पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती. नेपाळी काँग्रेस तसेच मधेशी पक्षांनी दहल यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिल्याने ते पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. पाठिंबा देताना नेपाळी काँग्रेसने प्रचंड यांच्यासोबत करार केला होता. यानुसार २०१८ पर्यंत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानपदावर संधी दिली जाणार होती. यानुसार पहिले दहल यांना संधी देण्यात आली होती.

नेपाळमध्ये मध्यवधी निवडणुका सुरु असताना दहल राजीनामा देणार की नाही यावर तर्कवितर्क लढवले जात आहे. बुधवारी दुपारी दहल यांनी राजीनामा दिला आहे. नेपाळी काँग्रेसचे नेते शेर बहादूर देउबा यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा करण्यासाठी दहल यांनी राजीनामा दिला. ६२ वर्षीय दहल हे नेपाळचे ३९ वे पंतप्रधान होते. प्रचंड हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. यापूर्वी २००८ साली प्रचंड हे पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. मात्र त्यांची ही कारकीर्द अल्पजीवी ठरली होती. २००९ मध्ये तत्कालीन सेनाप्रमुखांना बरखास्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या मुद्द्यावरून लष्कराशी त्यांचे तीव्र मतभेद झाल्याने त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते.

नेपाळमध्ये वीस वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका सुरु आहेत.  १४ जूनरोजी या निवडणुकीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे. हा टप्पा पूर्ण होईपर्यंत दहल यांनी राजीनामा देऊ नये असे कम्यूनिस्ट पक्षाचे नेते केपी ओली यांनी म्हटले होते. पण यानंतरही त्यांनी राजीनामा दिला आहे.