नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यू विषयीच्या ७० वर्षे जुन्या रहस्यावर प्रकाशझोत टाकणारा कागदपत्रांचा नवा संच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये भारत आणि रशियादरम्यानच्या सरकारीपातळीवरील गोपनीय पत्रव्यवहाराचा समावेश आहे. ब्रिटनमधील पत्रकार आणि बोस यांचे चिरंजीव आशिष रे यांच्याकडून टप्प्याटप्याने हे दस्तावेज प्रसिद्ध करण्यात येत आहेत. दस्तावेजांच्या आधारे १९४५ मध्ये बोस रशियामध्ये आल्याचे समजते. कागदोपत्री असलेल्या नोंदीनुसार बोस यांच्या मृत्यूचेदेखील हेच वर्ष आहे. या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोला जात असून, त्यांच्या मॉस्को दौऱ्याआधी हे दस्तावेज समोर आले आहेत.
रे यांनी केलेल्या दाव्यानुसार या दस्तावेजांमध्ये तैवान, जपान, पाकिस्तान आणि ब्रिटनचे राष्ट्रीय अभिलेखागार तसेच ब्रिटिश लायब्ररीमधून एकत्रित करण्यात आलेल्या कागदपत्रांचा समावेश आहे. यामध्ये भारत आणि रशियन सरकारकडून मिळविण्यात आलेल्या काही गुप्त कागदपत्रांचादेखील समावेश आहे. या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या पहिल्या संचात मॉस्कोतील भारतीय दूतावास आणि रूसी परराष्ट्र मंत्रालयादरम्यानचा अधिकृत पत्रव्यवहार दर्शविण्यात आल्याचा दावा केला गेला आहे. १६ सप्टेंबर १९९१ रोजीच्या पहिल्या पत्रात सुभाष चंद्र बोसांविषयी प्रकाश टाकणारी कोणतीही वस्तू सादर करण्याची विनंती रशियन सरकारला करण्यात आली आहे. जानेवारी १९९२ मध्ये मिळालेल्या उत्तरानुसार १९४५ आणि त्यानंतर सुभाषचंद्र बोस रशियात राहिल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. याबाबतची नेमकी माहिती मिळविण्यासाठी जुलै १९९५ मध्ये भारतीय दूतावासाद्वारे दुसऱ्यांदा विनंती करण्यात आली असता रशियन मंत्रालयाद्वारे पुन्हा एकदा तशाचप्रकारचे उत्तर देण्यात आले. हाती आलेल्या कागदपत्रांवरून सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात नक्की काय झाले याची माहिती समोर येईल असा विश्वास रे यांनी व्यक्त केला. लवकरच एका संकेतस्थळाची निर्मिती करून या कागदपत्रांना प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. नेताजींबरोबर नेमके काय घडले याविषयी अनेत तर्कवितर्क मांडले जातात. १९४५ सालच्या विमान दुर्घटनेत ते बचावल्याचेदेखील बोलले जाते. या महिन्याच्या शेवटी मोदी मॉस्कोमध्ये व्लादिमीर पुतिन यांना भेटणार आहेत. बोस रशियात गेल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे आणि अनुयायांचे मानणे आहे. बोस खरोखरीच रशियात गेले होते का हा विषय आपल्या रशिया भेटीत मांडणार असल्याचे आश्वासन मोदींनी बोस यांच्या नातेवाईकांना दिले आहे. नेताजींच्या जयंतीच्या दिवशी २३ जानेवारीला त्यांच्या संबंधिचा पहिल्या टप्प्यातील गोपनीय दस्तावेज सार्वजनिक करणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे.