आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जुने मित्र तसेच भारताचे माजी राजदूत ए सी एन नंबियार हे सोविएत रशियाचे हेर होते असे ब्रिटनच्या नॅशनल अर्काइव्हजच्या खुल्या करण्यात आलेल्या कागदपत्रावरून स्पष्ट झाले आहे.  
नंबियार हे १९२४ मध्ये पत्रकार म्हणून बर्लिनला गेले व तेथे भारतीय कम्युनिस्ट गटाबरोबर काम केले. १९२९ मध्ये ते सोविएत रशियाचे पाहुणे म्हणून तेथे गेले. दुसरे महायुद्ध सुरू होताच नंबियार यांना जर्मनीतून हाकलण्यात आले परंतु नंतर सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी म्हणून त्यांना पुन्हा जर्मनीने प्रवेश दिला. नंबियार हे जर्मनीने अर्थपुरवठा केलेल्या युरोपातील स्वतंत्र भारत चळवळीचे नेते होते, त्यावेळी सुभाषचंद्र बोस हे जपानला जाऊन मिळाले होते.
ए सी नारायण नंबियार यांना जून १९४५ मध्ये ऑस्ट्रियात अटक झाली व नाझींना जाऊन मिळाल्याबद्दल त्यांचे जाबजबाब झाले. युद्धानंतर ते बर्न येथे भारताचे प्रतिनिधी होते. नंतर स्कँडेनेव्हिया व पश्चिम जर्मनीत भारताचे राजदूत व युरोपात हिंदुस्तान टाईम्सचे प्रतिनिधी होते.  त्यांचे शेवटचे पद हे औद्योगिक गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या मोहिमेतील होते. १९५९ मध्ये ही बाब उघड झाली होती.
 ब्रिटिश कागदपत्रात नेताजींच्या आझाद हिंदू सेनेच्या जर्मनी व युरोपातील कार्यकर्त्यांची नावे आहेत. नंबियार यांनी बोस यांना पाठवलेली पत्रे जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करल्यानंतर युबोट २३४ या पाणबुडीत सापडली होती.विशेष म्हणजे नंबियार हे नेहरूंना प्रमुख व्यक्ती मानत होते. त्यांनीच नंबियार यांना राजदूत नेमले. ब्रिटिश मार्क्‍सवादी इतिहासकार एरिक होब्सबॉम यांच्या सात फायली व इत कागदपत्रांवरून ही माहिती देण्यात आली आहे.