नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गोपनीय माहिती असलेल्या १०० फाईल्स त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या भारतीय अभिलेखागारात (एनएआय) हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या नेताजींच्या कुटुंबियांना या फाईल्स पाहिल्यानंतर भावना अनावर झाल्या. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ११९ वी जयंती आहे. दरम्यान, एनएआयकडून आगामी काळात प्रत्येक महिन्याला नेतांजीसंदर्भातील २५ फाईल्स सार्वजनिक करणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
नेताजींसदर्भात उपलब्ध असलेला समग्र सरकारी दस्तावेज डिजिटल स्वरुपात संग्रहित करण्यात आला आहे. हा दस्तावेज खुला करावा अशी मागणी नेताजींचे वारस तसेच सर्वसामान्य भारतीय अनेक काळापासून करत होते. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला नेताजींच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी नेताजींशी संबंधित फाईल्स सरकार सार्वजनिक करेल अशी ग्वाही त्यांना दिली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ४ डिसेंबरला ३३ फाईल्स सार्वजनिक करण्यासाठी राष्ट्रीय अभिलेखागाराच्या सुपूर्द केल्या होत्या. दरम्यान, नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी आपल्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला असण्याची पूर्ण शक्यता आहे; परंतु आणखी काही पुरावे समोर आल्यास आपण खुल्या मनाने हे स्वीकारण्यास तयार आहोत,अशी भावना व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नेताजींशी संबंधित या फाईल्स सार्वजनिक झाल्याने आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता नाही. याऐवजी भारत सरकारने जपान सरकारच्या मदतीने रिनकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या त्यांच्या अस्थींची डीएनए चाचणी करून घ्यावी म्हणजे या संपूर्ण वादावर पडदा पडेल.