रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सोमवारी नवे खानपान सेवा धोरण लागू केले आहे. नव्या धोरणानुसार आयआरसीटीसीला देशभरातील ट्रेनमध्ये खानपान सेवा पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच रेल्वेच्या सर्व विभागातील पँट्री कार सेवेचे कंत्राटदेखील आयआरसीटीसीला देण्यात आले आहे.

रेल्वे प्रवाशांना स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण पुरवणे, ही आता पूर्णपणे रेल्वेची जबाबदारी असेल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. जेवण तयार करण्यापासून ते वाढण्यापर्यंतची जबाबदारी संबंधित क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना दिली जाईल, असेही प्रभू यांनी सांगितले आहे. आतापर्यंत ज्या ट्रेनमध्ये खानपान सेवा देण्याचे कंत्राट दुसऱ्या कंपन्यांकडे होते, त्यांचे कंत्राट पूर्ण होताच त्या ट्रेनमध्ये खानपान सेवा पुरवण्याची जबाबदारी आयआरसीटीसीला देण्यात येईल.

महिलांना आरक्षण
नव्या खानपान सेवा धोरणात महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. खानपान सेवेची कंत्राटे देताना त्यामध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच सर्व स्वयंपाकगृहे विभागीय रेल्वेच्या अधिकारक्षेत्रात असणार आहेत. यासोबतच ए-१ आणि ए श्रेणीतील सर्व रेल्वे स्थानकांवर असलेल्या जन-आहार आणि फूड प्लाझा यांची जबाबदारीदेखील आयआरसीटीसीकडे असणार आहे.

नव्या ट्रेनला हिरवा कंदिल
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अंत्योदय आणि नव्या हमसफर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. हमसफर वर्गातील चौथ्या ट्रेनला सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवला.