कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचा आपण बंदोबस्त करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सुलखन सिंह यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशची कायदा आणि सुव्यवस्था नीट राखावी याच कामासाठी आपल्याला नियुक्त करण्यात आले असून आपण हे काम चोखपणे बजावणार असल्याचे सिंह यांनी म्हटले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपणास कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे आदेश दिले आहेत. आपण त्या प्रमाणेच काम करणार आहोत असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून कत्तलखान्यांविरोधात मोहीम उघडली गेली आहे.

ज्या कत्तलखान्यांकडे परवानगी आहे ते कत्तलखाने सुरू ठेवण्यास काही अडचण नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तरी देखील काही ठिकाणी काही तथाकथित गोरक्षक कायदा हाती घेतात त्यांचा आपण बंदोबस्त करणार असल्याचे सिंह यांनी म्हटले. जावेद अहमद यांची अतिरिक्त सशस्त्र पोलीस दलात प्रमुख म्हणून बदली करण्यात आल्यानंतर सिंह यांनी महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. उत्तर प्रदेशामध्ये मोरल पोलिसिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान यूपी पोलिसांसमोर आहे. गोरक्षक असो वा लव्ह जिहाद विरुद्ध काम करणारे कार्यकर्ते, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे सिंह यांनी म्हटले. कुणावरही कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांकडे देण्यात आला आहे. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता पोलीस प्रशासनाने काम करावे अशी सूचना आपण पोलिसांना दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.