जम्मू काश्मीरमध्ये तीन फुटांचा दहशतवादी सुरक्षा यंत्रणांसाठी नवीन डोकेदुखी ठरत आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या हल्ल्यांमागे जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी नूर मोहम्मद तंत्रे याचा हात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या मते पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील नूर मोहम्मदने दक्षिण काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदची धुरा सांभाळली आहे. नूर मोहम्मदला २००३ साली अटक करण्यात आली होती. पोटातंर्गत न्यायालयाने त्याला २०११ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, पॅरोल मिळाल्यानंतर तो पुन्हा तुरूंगात परतलाच नाही. तो पुन्हा दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदमध्ये सक्रिय झाला.

नूर मोहम्मद हा जैश-ए-मोहम्मदमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे अवंतीपुरा येथील पोलीस अधीक्षकांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. सध्या या संघटनेत तो महत्वाची भूमिका निभावत असल्याचेही एका अधिकाऱ्याने म्हटले. काश्मीरमध्ये सध्या होत असलेल्या घटनांमागे जैश-ए-मोहम्मदचा नूर आणि दुसरा कमांडर मुफ्ती वकासची मुख्य भुमिका असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात पुलवामा जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना नूर मोहम्मदचा पाठिंबा होता. या हल्ल्यात आठ सुरक्षा कर्मचारी शहीद तर तीन दहशतवादी मारले गेले होते.

त्याचबरोबर ३ ऑक्टोबर रोजी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमातळाबाहेर बीएसएफच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात तीन फुटांच्या नूर मोहम्मदचाही हात असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला होता. यावेळी तीन दहशतवादी ठार झाले होते. जम्मू-काश्मीरचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नईम अख्तर यांच्या अश्वपथकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागेही नूर मोहम्मदचाही हात होता. २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार जैशचा कमांडर गाजीबाबाचा नूर मोहम्मद हा खास सहकारी होता. गाजी बाबाच्या मृत्यूनंतर नूर मोहम्मदला दिल्लीतील सदर बाजार येथून ३१ ऑगस्ट २००३ मध्ये अटक करण्यात आले होते. अटकेवेळी त्याच्याकडे १९.२ लाख रूपयांची रोकड मिळून आली होती.

दिल्लीतील तिहार तुरूंगात तो काही काळ होता. त्यानंतर त्याला श्रीनगर तुरूंगात हलवण्यात आले होते. २०१५ मध्ये मोहम्मदला काही दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्यात आले होते. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने त्याच्या पॅरोलमध्ये वाढ केली. त्यानंतर तो तुरूंगात परतलाच नाही. नूर मोहम्मद हा केवळ तीन फुट उंचीचा आहे. त्यामुळे तो सहज ओळखला जाऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे.