राम सेतूला धक्का नाही : गडकरी
रामेश्वरम (तामिळनाडू): सेतुसमुद्रम प्रकल्प राबवताना रामसेतू नष्ट करण्याचा प्रश्नच नाही, तसेच पर्यावरणाला धोका न पोहचवता हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी परिसराची पाहणी केल्यानंतर दिली.
या योजनेबाबत सरकार विविध चार ते पाच पर्याय पडताळून पाहत असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. श्रीलंकेला वळसा घालून जाण्याऐवजी देशाच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरून जाणाऱ्या जहाजांना पाल्कच्या सामुद्रधुनीतूनच लहानसा जलवाहतूक उपलब्ध करुन देण्याचा सेतुसमुद्रम प्रकल्पाचा उद्देश आहे. मात्र या प्रकल्पात राम सेतूला धोका असल्याने त्याबाबत विरोध नोंदवल्याने प्रकल्प रखडला. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतर गडकरींनी राम सेतू नष्ट केला जाणार नसल्याचे आश्वासन दिले. मच्छीमारांवर परिणाम होईल या भीतीने तामिळनाडू सरकारने याला विरोध केला आहे.   

अंमली पदार्थाविरोधात मोदींची मोहीम
नवी दिल्ली : अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेचे मोठे आव्हान भारताच्या तरुण पिढीसमोर उभे राहिले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी काय-काय उपाययोजना करता येतील आणि अशा आव्हानांचा सामना करण्याचे आपले अनुभव काय आहेत, हे मला कळवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना तसेच स्वयंसेवी संस्थांना केले आहे. रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी या विषयाला स्पर्श केला, तसेच या विषयाशी संबंधित आपली मते नागरिकांनी ‘मायगव्ह’ या संकेतस्थळावर नोंदवावीत, अशी सूचनाही केली.अंमली पदार्थाच्या व्यसनाधिनतेविरोधात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी आपले अनुभव आणि आपली कार्यपद्धती ‘मायगव्ह’ या संकेतस्थळावर मांडावी. नागरिकांनीही आपली मते, सूचना संकेतस्थळावर ‘शेअर’ कराव्यात आणि अशा बाबी खुल्या करण्यात संकोच वाटत असेल, तर अशा व्यक्तींनी मोकळेपणे थेट मला पत्राद्वारे आपले अनुभव कळवावेत, अशी सूचना पंतप्रधानांनी ट्विप्पणीद्वारे केली आहे.

स्फोटामागे परदेशी शक्ती
लाहोर : वाघा सीमेवर रविवारी झालेल्या स्फोटामागे परदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता पाकिस्तानातील पंजाब सरकारने व्यक्त केली आहे. दरम्यान, पाकमधील तीन संघटनांनी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या स्फोटात ६१ जण मरण पावले आहेत. पंजाबचे अंतर्गत सुरक्षा मंत्री कर्नल शुजाह खानझादा यांनी सांगितले की, आत्मघाती हल्लेखोराला परेड अ‍ॅव्हेन्यू येथे स्फोट करायचा होता व तसे केले असते तर पाकविरोधात आंतरराष्ट्रीय दलांमार्फत कारवाई करण्यासाठी संधी मिळाली असती. त्यामुळे यात परदेशी शक्तींचा हात असावा.

ख्रिश्चन जोडप्याला जिवंत जाळले
लाहोर: मुस्लिमांच्या कुराण या धर्मग्रंथाची निंदा केल्याच्या कथित प्रकरणी संतप्त जमावाने एका ख्रिश्चन जोडप्याला जाळून ठार केले. कसूर जिल्हय़ातील कोट राधा किशन येथे ही भयंकर घटना घडली. अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देण्यासाठी तेथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मृत जोडप्याचा नातलग एमॅन्युअल सर्फराझ याने सांगितले, की शहजाद मसिह (३५) व त्याची पत्नी शमाह (३१) हे महंमद युसूफ गुज्जर याच्या भट्टीवर काम करीत होते. युसूफ त्यांना पगार देत नव्हता त्यामुळे हे जोडपे चार मुलांसह हे काम सोडणार होते. मालकाने त्यांच्याकडून काम सोडण्याबद्दल पाच लाख रुपये मागितले. दोन दिवसांपूर्वी शाब्दिक चकमकीनंतर युसूफने या जोडप्याला मुलांसह कुलूपबंद खोलीत कोंडले. नंतर आज अचानक दोन मशिदींनी अशी घोषणा केली, की मसिह व त्याच्या पत्नीने कुराणाची पाने जाळून ईश्वरनिंदा केली आहे. त्यामुळे स्थानिक धर्मगुरू भट्टीवर पोहोचले व त्यांनी जमावाच्या मदतीने या जोडप्याला ओढत बाहेर आणले. त्यांनी त्यांचा छळ करून त्यांना भट्टीत फेकले. त्यात ते जळून मरण पावले.  

नायजेरियातील हल्ल्यात ३२ ठार
पोटीस्कुम, नायजेरिया : नायजेरियातील ईशान्येकडे मुस्लीम ब्रदरहूडच्या धार्मिक मिरवणुकीच्यावेळी एका आत्मघाती व्यक्तीने स्फोट केल्याने ३२ नागरिक ठार झाले. हल्लेखोरही यात ठार झाला. स्फोटात ११९ जण जखमी झाले असून योबेची राजधानी असलेल्या पोटिसकुम येथे रूग्णालयात अनेक जखमींची नोंद झाली आहे. दुसऱ्या एका घटनेत एका बंदूकधाऱ्याने सेंट्रल कोगी गेट येथील तुरूंगात हल्ला करून १४५ कैद्यांची मुक्तता केली. रविवार रात्री हा हल्ला करण्यात आला होता. पोटिस्कुम येथे मुस्लीम ब्रदरहूडच्या कार्यकर्त्यांनी आत्मघाती स्फोटाच्या ठिकाणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. जमावाने त्यांना मारहाण केली. नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

इबोलावर नाकावाटे लस
वॉशिंग्टन: इबोला या प्राणघातक रोगावर नाकावाटे घेण्याची लस तयार करण्यात आली असून त्याच्या मदतीने बराच काळ या रोगापासून संरक्षण मिळू शकते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. या लशीच्या चाचण्या सुरू असून मानवेतर प्राण्यांत त्यामुळे चांगले परिणाम दिसून आले आहेत. ही लस नाकावाटे द्यावयाची असल्याने त्यात वाहतूक, इंजेक्षन, साठवणूक असे अनेक सोपस्कार वाचणार आहेत. इबोलाच्या सध्याच्या संसर्गात पाच हजार लोक मरण पावले आहेत. इबोला विषाणूचा शोध १९७६ मध्ये लागला होता. आताच्या नव्या लशीमुळे प्राण्यांना ६७ ते १०० टक्के संरक्षण १५० दिवसांपर्यंत मिळाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

कॉन्स्टेबलला दहा वर्षे तुरूंगवास
डेहराडून : सात वर्षांपूर्वीच्या एका बलात्कार प्रकरणात स्थानिक न्यायालयाने पोलिस कॉन्स्टेबलला दहा वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश नितीन शर्मा यांनी कॉन्स्टेबल राजेंद्र सिंग याला १० वर्षे तुरूंगवास व २० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. २००७ मध्ये त्याने टिहरी येथील एका महिलेवर बलात्कार केला होता. लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर बलात्कार केला व दोनदा गर्भपातही केला होता.