आठ वर्षांच्या कारकीर्दीनंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी आज राजीनाम्याची घोषणा केली. या पदावरुन स्वतःची मुक्तता करुन घेताना त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले.

हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता असे त्यांनी म्हटले. यापुढे आपण काय करणार हे आपल्याला माहित नसल्याचीही कबुली त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यासोबतच त्यांनी न्यूझीलंड राष्ट्रीय पक्षाच्या नेते पदाचाही राजीनामा दिला. न्यूझीलंडच्या महान नेत्यांपैकी एक म्हणून की यांची गणना होते.

देशाच्या चांगल्या आणि वाईट काळात की यांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली आपल्या देशाने प्रगती साधली. त्यांच्या काळात आपल्या देशाने आत्मविश्वास कमवून एक यशस्वी राष्ट्र म्हणून ओळख स्थापित केली असे गौरवोद्गार त्यांच्याबाबत न्यूझीलंडचे उप-पंतप्रधान बिल इंग्लिश यांनी काढले.

जेव्हा की यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा संपूर्ण देशाला धक्का बसला. त्यांच्या खासदारांना देखील ही घोषणा अनपेक्षितच होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा राजीनामा आपल्या पत्नीच्या सांगण्यावरुन दिला.

की दाम्पत्याला दोन एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या आयुष्यात की यांचा हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढला होता. त्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन कुटुंबावरच लक्ष केंद्रित करा असा सल्ला त्यांची पत्नी ब्रोनाघ यांनी त्यांना दिला असे सूत्रांनी सांगितले.

१२ डिसेंबरपर्यंत न्यूझीलंड राष्ट्रीय पक्ष आपल्या नेत्याची निवड करणार आहे. जर बिल इंग्लिश हे या पदासाठी इच्छुक असतील तर आपला त्यांना पाठिंबा असेल असे की यांनी जाहीर केले आहे.
२००१ एक साली इंग्लिश हे न्यूझीलंडचे पंतप्रधान झाले होते. परंतु २००२ मध्ये राष्ट्रीय पक्षाला निवडणुकांमध्ये मोठी हार पत्करावी लागल्यामुळे त्यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.

अर्थिक विकास मंत्री स्टीवन जॉयस, हवामान बदल आणि उप-अर्थमंत्री पौला बेनेट, गृह मंत्री ज्युडीथ कॉलीन्स यांचा पर्यायदेखील राष्ट्रीय पक्षासमोर आहे. विरोधी पक्ष लेबर पार्टी आणि ग्रीन पार्टी यांनी देखील की यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वैयक्तिक कारणामुळे राजीनाम्याचे दिला असल्याचे कारण की यांनी सांगितले असले तरी विरोधी पक्षात त्यांच्या राजीनाम्याबाबत दोन प्रवाह आहेत. काहींना हे खरे वाटते की त्यांनी राजीनामा आपल्या वैयक्तिक कारणासाठी दिला असावा तर न्यूझीलंडची आर्थिक स्थिती खालवत चालली होती त्यामुळे येणाऱ्या काळात अडचणींना तोंड देऊन आपली प्रतिष्ठा पणाला लागू नये म्हणून की यांनी राजीनामा दिला असे देखील काही जणांचे म्हणणे आहे.