जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्यासह आणखी तिघांविरुद्ध विशेष न्यायालयाकडून अटक वॉरंट मिळवल्यानंतर, पठाणकोट येथील हवाई तळावरील हल्ल्यातील या चौघांच्या कथित सहभागासाठी त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इंटरपोलशी संपर्क साधला आहे.

मोहाली येथील विशेष एनआयए न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटसह या हल्ल्याबाबतची माहिती असलेली फाइल देशात इंटरपोलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सीबीआय या नोडल एजन्सीला पाठवण्यात आली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

अझहर मसूद व त्याचा भाऊ अब्दुल रौफ यांच्यासह पठाणकोटला हल्ला करण्यासाठी ३० डिसेंबरला पंजाबच्या बामियाल भागात भारतात घुसखोरी केलेल्या जैशच्या दहशतवाद्यांचे सूत्रधार काशिफ जान व शाहीद लतिफ अशा चौघांविरुद्ध एनआयएला वॉरंट मिळालेले आहे. दहशतवादी आणि जान व लतिफ यांच्यासारखे त्यांचे सूत्रधार यांच्यातील दूरध्वनी संभाषणासह या प्रकरणाबाबतचा पुरावा, तसेच हे वॉरंट एनआयएने इंटरपोलकडे पाठवले आहे. मसूदचा भाऊ अब्दुल रौफ याचा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या संकेतस्थळाचा इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेसही इंटरपोलला दिला आहे. या व्हिडीओमध्ये रौफ या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना आणि ‘आपल्या मुलांचे’ त्यासाठी अभिनंदन करताना दिसत आहे. त्यानंतर हा व्हिडीओ हटवण्यात आला असून हे संकेतस्थळही सायबर जगतातून नाहीसे झाले आहे. अब्दुल रौफ याच्याविरुद्ध १९९९ सालच्या आयसी-८१४ या विमानाच्या अपहरणाच्या संदर्भात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस प्रलंबित आहे.