संशयित इस्लामी अतिरेक्यांनी नायजेरियातील २२३ शाळकरी मुलींचे अपहरण केले आह़े  राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या समस्येतून मार्ग काढण्यासाठी नायजेरियाचे अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना मदतीसाठी साकडे घातले आह़े
रविवारी गुडलक यांच्या दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आलेल्या संदेशात त्यांनी मुलींना कोणत्याही परिस्थितीत सुखरूप परत आणण्याचे आश्वासन दिले होत़े  हा या देशातील प्रयत्नांचा काळ आह़े   परंतु पालकांनी आणि स्थानिकांनी या बचावकार्यात सहकार्य करावे, असे आवाहन गुडलक यांनी केले आह़े
या बाक्या प्रसंगात अमेरिकेबरोबर फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या जागतिक महासत्तांकडेही मदत मागितल्याचे गुडलक यांनी सांगितल़े  चीनचे पंतप्रधान ली केक्विंग हे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच आफ्रिकेच्या दौऱ्यावर येणार आहेत़  बुधवारी नायजेरियाची राजधानी अंबुजामध्ये होणाऱ्या जागतिक वित्त परिषदेत ते भाग घेणार आहेत़
जे देश आम्हाला मदत करू शकतील, असे वाटते त्यांना आम्ही मदत करीत आहोत़  त्यापैकी अमेरिका सर्वात प्रथम क्रमांकावर आहे, असेही गुडलक यांनी सांगितल़े
१४ एप्रिल रोजी ईशान्य बोनरे राज्यातील चिबोक शहरातील वसतिगृहातून या शाळकरी मुलींचे अपहरण करण्यात आले आह़े  त्यांची सुटका करण्यास वेळ लागत असल्यामुळे नायजेरियन जनतेमध्ये संतापाची भावना आह़े