नायजेरियामधील बोको हराम या दहशतवादी संघटनेविरुद्ध मोहीम राबवत असताना हवाई दलाने चुकून निर्वासितांच्या छावणीवर हल्ला केला. या हल्ल्यात १०० नागरिकांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी नायजेरियन सैन्याने चौकशीचे आदेश दिले आहेत.

नायजेरियामध्ये सैन्य आणि बोको हराम या दहशतवादी संघटनेमध्ये संघर्ष सुरु आहे. बोको हरामला नेस्तनाबूत करण्यासाठी सैन्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र हा संघर्ष नायजेरियामधील सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. नायजेरियातील ईशान्येकडील रन या भागात निर्वासितांची छावणी आहे. कॅमेरुन या देशाच्या सीमारेषेवर ही छावणी आहे. या निर्वासितांच्या छावणीवर मंगळवारी बोको हरामच्या लढाऊ विमानाने हल्ला केला. या भागात बोको हरामचे दहशतवाद्यांचे पथक लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मात्र चुकून दहशतवाद्यांऐवजी निर्वासितांच्या छावणीवर हल्ला झाला अशी माहिती नायजेरियन सैन्याने दिली आहे. हा हल्ला चुकून झाला आहे. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत असे नायजेरियन सैन्याचे प्रमुख मेजर जनरल लकी इराबोर यांनी सांगितले.

निर्वासितांच्या छावणीर झालेल्या हल्ल्यात रेड क्रॉस या संघटनेच्या २० कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. युद्धग्रस्त नायजेरियामध्ये रेड क्रॉ़सतर्फे मदत केली जाते. या घटनेमध्ये आत्तापर्यंत १२० हून अधिक जण जखमी झाले आहे. नायजेरियन सैन्याने पहिल्यांदाच चुकून हवाई हल्ला केल्याची कबूली दिली आहे. बोको हराम या दहशतवादी संघटनेतर्फे २०१४ मध्ये ३०० विद्यार्थिनींचे अपहरण करण्यात आले होते. या मुलींची गेल्या वर्षी सुटका झाली होती. यातील तीन मुलींचा नायजेरियन हवाई दलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला अशी माहिती या मुलींनी सुटकेनंतर दिली होती. बोको हराम ही दहशतवादी संघटना सगळ्यात क्रूर दहशतवादी संघटना मानली जाते. क्रूरतेच्या बाबतीत ही संघटना इसिसपेक्षाही एक पाऊल पुढे आहे. अबु बकर शेकाऊ हा या संघटनेचा म्होरक्या आहे. २०१४ या वर्षांत अत्यंत निर्दयपणे या संघटनेने साडेसहा हजारांहून अधिक लोकांचे प्राण घेतले होते.