उत्तरप्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये चार नायजेरियन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी ही मारहाण केली आहे. पीडित तरुणांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली असून यासंदर्भात योगी आदित्यनाथांशी चर्चा केली आहे. याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले.

ग्रेटर नोएडामध्ये मनिष खारी या १२ वीत शिकणाऱ्या मुलाचा शनिवारी मृत्यू झाला होता. नायजेरियन तरुणांनी मनिषला जबरदस्तीने अंमलीपदार्थ दिले आणि अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असा स्थानिकांचा आरोप आहे. मनिष हा शुक्रवारपासून बेपत्ता होता.शनिवारी दुपारी तो परिसरातील गेटजवळ बेशुद्धावस्थेत आढळला. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तो बेशुद्ध झाला होता. शनिवारी संध्याकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणाशी संबंधित पाच नायजेरियन तरुणांवर गुन्हा दाखल करावा अशी स्थानिकांची मागणी होती. मनिषच्या मृत्यूनंतर रविवारी ग्रेटर नोएडामध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नायजेरियन तरुणांना परिसरातून बाहेर काढा अशी मागणी मोर्चेकरांनी केली. या मेणबत्ती मोर्चात स्थानिकांची उपस्थिती लक्षणीय होती. मात्र अचानक जमाव हिंसक झाला. त्यांनी परिसरातील चार नायजेरिन तरुणांना बेदम मारहाण केली. हे सर्व जण खरेदीसाठी आले होते. त्यांचा मनिष खारी प्रकरणाशी काहीच संबंध नव्हता. सुरुवातीला एका नायजेरियन तरुणीचे अपहरण झाल्याचे वृत्तही होते. मात्र यात तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाणीच्या घटनेचे फुटेज आमच्या हाती लागले आहेत. या आधारे पाच संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ग्रेटर नोएडामधील मारहाणीचे पडसाद दिल्लीतही उमटले. नायजेरियन तरुणांनी ट्विटवरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मदतीसाठी साकडे घातले होते. सुषमा स्वराज यांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे. मंगळवारी सकाळी सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. मी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांशी चर्चा केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले. केंद्र सरकारने या घटनेची दखल घेतली असून उत्तरप्रदेशकडून अहवाल मागवल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केले आहे.