राजस्थानमधील जैसलमेर येथे पाकिस्तानी सीमेजवळ मोठी दुर्घटना घडली. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) किशनगढ फील्ड फायरिंग रेंजवर मंगळवारी सकाळी सरावावेळी उखळी तोफांचा स्फोट झाला. या घटनेत बीएसएफचे ९ जवान जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीएसएफच्या सूत्रांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जैसलमेरच्या किशनगढ फील्ड फायरिंग रेजवर बीएसएफ बिकानेरच्या ११२ व्या तुकडीतील जवान सराव करत होते. जवान ५१ एमएमच्या उखळी तोफांच्या माऱ्याचा सराव करत होते. त्याचवेळी काही तांत्रिक बिघाडामुळे उखळी तोफेचा स्फोट झाला. त्यात बीएसएफचे ९ जवान जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सरावावेळी उखळी तोफेचा गोळा निश्चित लक्ष्यावर डागला गेला नाही. तो १० ते १२ फुटांवरच पडला आणि स्फोट झाला. त्याचे छर्रे तेथे असलेल्या जवानांना लागले. यात ते जखमी झाले. त्यांना रामगढ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे प्रथमोपचारानंतर त्यांना जैसलमेर येथील हवाई दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश बीएसएफने दिले आहेत.