बांगलादेशात ढाका येथे भल्यापहाटे दहशतवाद विरोधी मोहिमेअंतर्गत टाकण्यात आलेल्या छाप्यात नऊ इस्लामी दहशतवादी ठार झाले असून त्यामुळे हल्ल्याचा मोठा कट उधळला गेला आहे. पहाटे ५.५१ वाजता कल्याणपूर भागातील जहाज येथे एक तासभर छापे टाकण्यात आले. विशेष पोलिस दलांनी ही कारवाई केली आहे. दहशतवादी २० ते २५ वयोगटातील होते व जमातुल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेचे ते सदस्य होते. पोलिस पथक कारवाईसाठी गेले असता दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिस गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी मोठा हल्ला करण्याचा कट आखत होते व त्यामुळे हा छापा टाकण्यात आला, असे देशाचे पोलिस प्रमुख के.एम. शहीदुल हक यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशातील गुलशन भागात हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी जसे बॅकपॅक धारण केले होते तसेच या दहशतवाद्यांकडेही होते व कपडेही तसेच होते.

इस्लामी बंदुकधाऱ्यांनी ‘अलाहू अकबर’ असे ओरडत पोलिसांवर गोळीबार केला. यात दोन दहशतवाद्यांना जखमी अवस्थेत पकडण्यात आले. चकमकीत जखमी झालेला रकीबुल हसन उर्फ रिगन हा दहशतवादी गेल्यावर्षी बेपत्ता झाला होता, आता त्याला पकडण्यात यश आले. तो आयसिसचा सदस्य आहे. पोलिसांनी १३ हातबॉम्ब, एक तलवार, सात काडतुसे व बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.

पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले की, हल्ल्याच्या तयारीत असलेले दहशतवादी मारले गेल्याने मोठा धोका टळला आहे. पोलिसांनी ढाक्यात ही कारवाई केली. हसीना यांनी पोलिसांचे कौतुक करताना सांगितले की, त्यांची कामगिरी खरोखर प्रशंसनीय आहे व दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होते हे स्पष्ट झाले आहे.

बांगलादेशात अलीकडेच गुलशन भागात आयसिसने एका कॅफेवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीय मुलीसह २२ जण मारले गेले होते. त्या वेळी सहा हल्लेखोर ठार झाले तर एकाला जिवंत पक डले होते. त्या हल्ल्यात तीस जण जखमी झाले होते. त्यानंतर ईदच्या नमाजावेळी पुन्हा एक हल्ला झाला होता, त्यात तीन जण ठार झाले होते.

 

सोमालिया :  आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १३ ठार

मोगदिशू : मोगदिशू विमानतळाच्या नजीकच असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ आणि आफ्रिका युनियन इमारतींजवळ मंगळवारी घडविण्यात आलेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये किमान १३ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. जिहादी शबाब बंडखोरांनी हे आत्मघातकी हल्ले केल्याचा दावा केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. सोमालिया आणि शेजारच्या केनियामध्ये रक्तरंजित हल्ले अल-कायदाशी संलग्न शबाब बंडखोर गटांकडून करण्यात येत आहेत. मोगदिशूमधील आंतरराष्ट्रीय समुदायाने समर्थन दिलेले सरकार उलथून टाकण्याचा बंडखोरांचा प्रयत्न आहे. मंगळवारी घडविण्यात आलेल्या दोन स्फोटांमध्ये किमान १३ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. पहिला स्फोट सुरक्षा तपासणी नाक्यावर घडविण्यात आला, तर दुसरा स्फोट संयुक्त राष्ट्रसंघ इमारतीच्या आवारानजीक घडविण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. सदर हल्ले घडविल्याचा दावा शबाब बंडखोरांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.