दिल्लीतील एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात मेलेला उंदिर आढळून आल्याची घटना घडली. यामुळे शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, ही बातमी पसररल्यानंत विद्यार्थ्यांचे पालक आणि राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका विद्यार्थ्याच्या पालकांनी त्यांच्या मुलाला देण्यात आलेल्या जेवणात मृत उंदिर सापडल्याचा आरोप केला. आम्ही ही बाब खपवून घेणार नाही, असेही सांगितले. यावरून काँग्रेस पक्षानेही आक्रमक पवित्रा घेतला असून चौकशीची मागणी केली आहे. माध्यान्ह भोजन तयार करताना स्वच्छता आणि निगा राखलीच गेली पाहिजे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि एकाही दोषीला सोडता कामा नये, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या किरण वालिया यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका वसतिगृहातही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. चेंबूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील रविवारी सकाळच्या जेवणात पाल आढळली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. यापूर्वीही असे प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात खानावळ ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राहुल जांभुळकर या विद्यार्थ्यांला भाजीमध्ये पाल आढळून आली. या संदर्भात त्याने वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे तक्रार केली. या वसिगृहात एकूण १५० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यापूर्वीही वसतिगृहाच्या जेवणात काच आणि  गोगलगाय आढळली होती. याबाबत संबंधितांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र या तक्रारीची दखल न घेता त्याच कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा घाट सामाजिक न्याय विभागाने घातला आहे. याचबरोबर सामाजिक न्याय विभाग प्रशासन तीन कंत्राटदारांनाच आलटून-पालटून कंत्राट देत असल्याचा गंभीर आरोपही श्रावस्ती यांनी केला आहे. या कंत्राट घोटाळय़ाबाबत संघटनेने विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे तक्रार केली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.