काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांचे प्रतिपादन

सीमेपलीकडून खोदण्यात आलेले १४ फूट लांबीचे भुयार शोधून काढल्याबद्दल जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी रविवारी सीमा सुरक्षा दलाची प्रशंसा केली. लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही आघाडय़ांवर पराभव पत्करावा लागल्याने निराश झालेला पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हे भुयार शोधून काढल्याच्या दुसऱ्या दिवशी सिंह यांनी हे विधान केले. हे भुयार पाकिस्तानी बाजूने खणण्यात येत होते.

सीमेवर तसेच जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराकडून तसेच राजनैतिक मार्गानेही पराभव वाटय़ाला आल्यामुळे पाकिस्तान निराश झाला आहे. तो जगात एकटा पडला असून त्याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीननेही आपण दहशतवादाच्या मुद्दय़ावर पाकिस्तानला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असा दावा सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना केला. बीएसएफने शोधून काढलेल्या भुयाराबद्दल विचारले असता सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरला तसेच भारताला अस्थिर करण्याच्या उद्देशाने शक्य ते सर्व प्रयत्न पाकिस्तान करीत आहे. हे भुयार वेळेत शोधून काढून पाकिस्तानचा कुटिल डाव हाणून पाडल्याबद्दल त्यांनी बीएसएफचे कौतुक केले.

सशस्त्र घुसखोरांना भारतात घुसवण्यासाठी पाकिस्तानने ५४ वेळा प्रयत्न केले, मात्र आपल्या दक्ष फौजांनी यापैकी ४४ प्रयत्न हाणून पाडले, असा दावा सिंह यांनी केला. जे लोक घुसखोरी करण्यात यशस्वी झाले ते एक तर सीमेवर किंवा काश्मीरच्या अंतर्गत भागात मारले गेले. निरनिराळ्या दहशतवादी संघटनांचे एक डझनहून अधिक वरिष्ठ कमांडर या वर्षी मारले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.